धुळे । धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक म्हणजेच ग.स. बँकेवरील प्रशासक मंडळ हटविण्यात आले असून बँकेचा ताबा पुन्हा सभासद नियुक्त संचालक मंडळाला सोपविण्यात आला आहे. 22 मे रोजी ग.स. बँकेचे गटनेते चंद्रकांत देसले यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी ग.स. बँकेचा ताबा पुन्हा संचालक मंडळाकडे येणे हा योगायोग तसेच सी.एन. आबांना वाढदिवसाचे ‘बर्थ-डे गिफ्ट’ मानले जात आहे. या निर्णयाची प्रत मिळताच ग.स.बँकेत संचालकांसह अधिकारी, कर्मचार्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाक्याची आतषबाजी करीत परस्परांना पेढे भरविले.
20 मे 2017 रोजी केली होती प्रशासकाची नियुक्ती
ग.स. बँकेतील अनियमित व्यवहाराची तक्रार करीत विरोधकांनी वारंवार आरोप केल्याने रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी 20 मे 2017 रोजी ग.स. बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासकाची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 110, अ (1) (3) अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर गटनेते चंद्रकांत देसले यांना जणू बदनाम करण्याची मोहिमच विरोधकांनी उघडली होती. मात्र त्याचवेळी ग.स. बँकेचे गटनेते चंद्रकांत देसले आणि संचालक मंडळाने आपली बाजू वेळोवेळी मांडली. सहकार आयुक्तांकडे ठोस पुराव्यानिशी बाजू मांडतांनाच संचालक मंडळावर अन्याय झाल्याचेही म्हटले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नियुक्त प्रशासकाला आधी 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्या कालावधीत वाढ करीत 24 एप्रिल 2018 पर्यंत प्रशासकाची कारकिर्द वाढविली गेली होती. या कालावधीत गटनेते चंद्रकांत देसले व संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेतलेल्या बाबींची पूर्तता करण्यासह बँकेच्या ठेवींना धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने नियमानूसार प्रशासकीय कालावधीला वर्ष पूर्ण होताच बँकेचा ताबा पुन्हा एकदा संचालक मंडळाकडे सोपविण्याचे आदेश दिले. सहकार आयुक्त डॉ. विजय जडे यांनी तसे आदेशाचे पत्र जारी केले आहे.
निर्णयाचे स्वागत
या निर्णयाचे चेअरमन दत्तात्रय शिंदेसह व्हा. चेअरमन चंद्रकांत सत्तेसा, संचालक उमाकांत बिरारीस, निशांत रंधे, किशोर सोनवणे, संजय शिंदे, इंदास गावित, राजेंद्र सुर्यवंशी, तात्यासाहेब पवार, प्रा. शाम पवार, विजयकुमार दहिते, वसंत देवरे, भूपेंद्र निकम, जवाहर पवार, संजय पवार, मधुकर पाटील, निंबा माळी, राजेंद्र माईनकर, क्रांती जाधव, शोभा पवार यांनी स्वागत केले आहे. शिवाय प्रशासकाकडून पदभार स्विकारीत आनंदोत्सवही साजरा केला.