धुळे : येथील ग.स. बँकेच्या दहा कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीलाकारणीभूत ठरवून 59 आजी-माजी पदाधिकारी तसेच अधिकार्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्राधिकृत चौकशी अधिकारी तथा तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांनी ही नोटीस बजावली. त्यावर संबंधितांना म्हणणे मांडण्यासाठी दि. 3 एप्रिलपर्यंत पुराव्यासह हजर राहण्याची मुदत दिली. ग.स. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. तसेच प्राधिकृत अधिकारी के.आर. रत्नाळे यांच्यातर्फे बँकेच्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी होत आहे. त्यात लेखापरीक्षक जयेश देसले यांनी सन 2016-17च्या आर्थिक वर्षात आर्थिक अनियमितता, शंभरी टक्के नुकसानीला पात्र, आर्थिक नुकसानीला जबाबदार धरून कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागीय ग.स. बँकेच्या 59 आजीमाजी पदाधिकार्यांसह अधिकार्यांना नोटीस सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिले.
असे आहेत संचालक मंडळावर आरोप
यात बँकेच्या दहा कोटी रुपयांच्या नुकसानीला जबाबदार ठरवून अपराधी प्रवर्तकांची चौकशी करावी. त्यांच्याविरुद्ध जबाबदारी निश्चित करून नुकसानीची रक्कम व्याजासह वसूल करावी, यासाठी रत्नाळे यांनी प्राथमिक चौकशीनंतर 59 जणांना नोटीस बजावली. दि.16 मार्च रोजी त्यांनी नोटिसा पाठविल्या. तसेच याबाबत लेखी किंवा तोंडी स्वरूपात म्हणणे मांडण्यासाठी दि. 3 एप्रिलला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे नुकसान सस्पेन्स खाती नावे करून नफा-तोटा खात्यात रक्कम वर्ग करणे, रिझर्व्ह बँकेकडून बँकेला कोणतेही नवीन व्यवहार सुरू करण्याचे आदेश नसताना सभासद, खातेदारांना एटीएम कार्ड पुरविणे, निव्वळ नफा असतांना चुकीचा नफा दाखवून फसवणूक करणे, लाभांश वाटप, आयकर भरणा, जाहिरात खर्च, रिकव्हरी खर्च व रिकव्हरी चार्जेस आदीमध्ये हे नुकसान करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित पदाधिकारी, अधिकार्यांकडून नोटिसांना नेमके काय उत्तर दिले जाते व त्याच्यावर पुढील कोणती कारवाई केली जाते याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.