घटस्थापनेलाच राणेंचा ‘घटस्फोट’!

0

नारायण राणेंनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही दिला राजीनामा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेसपासून घटस्फोट घेतला. काँग्रेसने आपला वारंवार वापर करून घेतला. मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊन वारंवार मला हुलकावणी दिली, असा आरोप करत राणे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला व काँग्रेस सोडण्याची घोषणा गुरुवारी कुडाळ येथे केली. आपला राजीनामा त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यासोबतच राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. विधानपरिषदेच्या सभापतींकडे राजीनामा देण्यात आल्याचेही राणेंनी सांगितले. लवकरच राज्यव्यापी दौर्‍यास सुरुवात करणार असून, शिवसेना व काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. राणे कोणत्या पक्षात जाणार आहेत, याबाबत मात्र त्यांनी काहीच वाच्यता केली नाही. तथापि, त्यांची पाऊले भाजपची वाट चालत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. राणे यांनी राजीनामा दिला असला तरी, त्यांचे आमदार व खासदार पुत्र मात्र काँग्रेसमध्येच आहेत. राणे यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.

काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही!
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडणार आहेत. 25 नगरसेवक आताच माझ्यासोबत राजीनामे देणार आहेत. लवकरच आम्ही पुढचा निर्णय आणि भविष्यातील वाटचाल काय असेल, हेही स्पष्ट करू. उद्यापासून महाराष्ट्राचा दौरा करणार असून, नागपूरपासून दौर्‍याची सुरुवात करणार आहे, असेही राणे यांनी जाहीर केली. तुम्ही मला काय काढणार? असा सवाल करत, राणे म्हणाले की, 12 वर्षे काँग्रेसने माझा उपयोग करून घेतला. त्यामुळे आता माझ्यासोबत राज्यभरातून अनेक जण काँग्रेस सोडणार आहेत. शिवसेना आणि काँग्रेस असे दोन्हीही पक्ष आपण रिकामे करू, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. आम्हाला सहा महिने द्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, असे आश्वासन अहमद पटेल यांनी दिले होते, असे सांगून राणे म्हणाले, काँग्रेस माझ्यासोबत कशी वागली हे आता मी जाहीरपणे सांगणार आहे. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूलमंत्री म्हणून फिरलो. विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितले ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसांत शपथविधी होईल पण झाला नाही. तीनवेळा मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले गेले. वर्ष गेले तरी पद मिळाले नाही. उलट अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केले, असा गौप्यस्फोटही यावेळी राणे यांनी केला.

चव्हाणांनी काँग्रेसचा बट्ट्याबोळ केला!
नवरात्रीनंतर पुढील निर्णय घेणार असे सांगून, नारायण राणे म्हणाले, मी आणि माझ्या पदाधिकार्‍यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे सोपविले आहेत. मी पदाच्या मागे धावत नाही, पद माझ्या मागे येते असेही राणे यांनी नीक्षून सांगितले. काँग्रेसने माझा अपमान केला. विलासराव देशमुखांनंतर मीच मुख्यमंत्री होणार होतो. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसतानाही त्यांना मुख्यमंत्री बनविले गेले. मला आश्वासन दिले परंतु ते पाळले नाही. पद घ्यायचे आणि पदाचा वापर करायचा नाही, अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची संस्कृती आहे, अशी जोरदार टीकाही राणे यांनी केली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप करत त्यांनी मी नाराज असल्याच्या बातम्या येत असताना काँग्रेसचा कोणताही नेता माझ्याशी बोलला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करतानाही मला कुणी विचारले नाही, अशी टीकाही राणे यांनी केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झडत आहे. परंतु, त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडला असल्याची चर्चा मुंबईत सुरु होती. तथापि, त्याबाबत भाजपकडून अद्याप कुणीही काहीही बोलले नाही.