घटस्थापनेसाठी बाजारपेठेत लगबग; ग्रामीण भागात पोळ्याचीही तयारी

0

आंबेगाव । गणेशोत्वानंतर पितृपंधरवडा सुरू होतो आणि त्यानंतर लगेच घटस्थापना होत असते. यंदा गुरुवारी (दि.21) उत्सवास प्रारंभ होत आहे. त्याभुळे गावोगावी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवरात्र मंडळाकडून देवीच्या मूर्ती आरक्षित केल्या जात आहेत. घटस्थापना झाल्यावर सर्वत्र नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर मूर्तीकार देवीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. नवरात्र मंडळांमध्ये देवीची मूर्ती बसवली जात असल्याने मोठ्याच मूर्ती बनवल्या जात आहे. मंडळांमध्ये देवीची मूर्ती बसवली जात असल्याने लहान मूर्ती न बनवता मोठ्याच मूर्ती बनवल्या जात असल्याचे चांडोली बुद्रुक येथील मूर्ती कारागिर सुनिता शिंदे यांनी सांगितले.

मातीची बैलांची पूजेची प्रथा
ज्या शेतकर्‍याकडे बैल नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तर गावाकडून शहरात कामानिमित्त गेलेले अनेक लोक शहरात मातीचे बैल खरेदी करून त्यांची पुजा करून बैलपोळा साजरा करतात. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात मातीच्या बैलांना पोळ्याच्या दिवशी मोठी मागणी असते. आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाद्रपद महिन्यात अमावस्येला बैलपोळा साजरा करतात. हा सण बुधवारी (दि. 20) आला असल्याने मातीचे बैल बनवणार्‍या कारागिरांची लगबग वाढली आहे. चांडोली बुद्रुक येथील कारागिर मोहन शिंदे यांच्या कारखान्यात मातीच्या बैलांच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून सर्व कारागिर कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

मागील काही वर्षात देवीच्या मूर्तीची मागणी वाढत असून मूर्तीच्या आकारानुसार व त्यावरील रंगकाम, दागिने यांच्यावरून मूर्तीच्या किमती ठरत आहेत. मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून अनेक मंडळांनी मूर्तीची बुकींगही केल्याचे सुनिता शिंदे यांनी सांगितले. सध्या मूर्तीवरील रंगकाम सुरू असून अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू असून चार ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या असल्याचे मूर्ती कारखान्यात पहावयास मिळत आहे. चार हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत मूर्तीच्या किमती आहेत.

शेतीच्या विभाजनामुळे बैलांची संख्या कमी
भाद्रपद बैल पोळ्याचा सण बुधवारी (दि.20) असल्याने मातीचे बैल बनवणार्‍या कारागीरांची लगबग सुरू असून बैलांना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यांत्रिकीकरणामुळे बैलांचे महत्त्व कमी झाले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलपोळा हा सण शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पूर्वी दारापुढे असणार्‍या बैलांची शेतकरी पुजा करत. परंतु यांत्रिकीकरणामुळे व शेतीचे विभाजन होऊन कमी झालेल्या शेतीमुळे बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.