पुणे : महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी गुरुवारी सकाळी दहाला सुरू होणार असून, दुपारी दोनपर्यंत सर्व 162 जागांचे निकाल स्पष्ट होतील. मुंबईखालोखाल पुम्याच्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर येणार की भारतीय जनता पक्षावर महापालिकेत मुसंडी मारणार, याबाबत पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. महापालिकेच्या 162 जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. त्यानंतर एका संस्थेने एक्झिट पोल जाहीर केले. त्यात 77 ते 85 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत येईल. तसेच, राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, शहरातील नेते, राजकीय निरीक्षक व जाणकारांना हा अंदाज मान्य नसल्याचे बुधवारी दिसून येत होते. या दाव्यांमुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. जसजशी निकालाची वेळ जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.
गेली 15 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी महापालिकेत सत्तेवर आहे. पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने पुण्याच्या निकालाकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. यापूर्वी केंद्र व राज्यत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. यंदा प्रथमच सत्तेविना हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीस सामोरे गेले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सत्तारूढ भाजपशी या दोन्ही काँग्रेसची चुरशीची लढत होत आहे. महापालिकेत निर्विवाद बहुमताची भाजपची महत्त्वाकांक्षा आहे, तर राष्ट्रवादीला आपले स्थान कायम टिकवायचे आहे. त्यामुळेही या दोन पक्षांतील चुरस वाढली आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्षाच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपबरोबरची 25 वर्षांची युती तोडली आहे. त्यानंतर भाजपलाच लक्ष्य करत शिवसेना पुण्यातही निवडणूक मैदानात उतरल्याने भाजपपुढील आव्हान वाढले आहे. एकीकडे दोन्ही काँग्रेसनी आघाडी व मैत्रिपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारत निवडणुकीत उतरण्याचे धोरण स्वीकारले, तर दुसरीकडे भाजपला दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचा सामना एकहाती करावा लागला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपने निर्विवाद विजय संपादन केला. आता महापालिकेत भाजप हीच कामगिरी कायम ठेवणार का, याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरे झाली. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याने व त्यांपैकी काहीना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. शहरातील मतदारांतही याबाबत काहीशी नाराजी असल्याचे सांगितले जाते. पक्षांतर करून दुसर्या पक्षांत गेलेल्या व ऐनवेळी उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना मतदार स्वीकारतात की नाही, हेही निकालात स्पष्ट होईल. तसेच, पक्षांतर्गत नाराजी भाजपाल भोवणार का, हेही यातून स्पष्ट होईल.
शहराचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळेपुढील महापौर कोण असेल, याचेही आडाखे बुधवारी बांधले जात होते. भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी भावी महापौर म्हणूनच प्रचार केला. तर, हे पद डोळ्यासमोर ठेवूनच रेश्मा भोसले भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यास कोण महापौर होईल आणि राष्ट्रवादी आल्यास ही माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. त्या दृष्टीनेही निकालांकडे पाहिले जात असल्याचे दिसून आले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांतून येदा सर्वाधिक 28 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे त्या प्रभागांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडु केमसे, भाजपचे गटनेते गणेश बीडकर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, चंचला कोद्रे, दत्ता धनकवडे, वैशाली बनकर, कमल व्यवहारे, माजी उपमहापौर दीपक मानकर, दिलीप बराटे, बंडु गायकवाड व आबा बागुल, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार शिरोळे यांचे चिरजीव सिद्धार्थ शिरोळे आदी प्रमुख उमेदवारांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा, आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले, आमदार माधुरी मिसाळ यांच्या भगिनी मानसी देशपांडे, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, माजी मंत्री शसिकांत सुतार यांचे चिरजीव पृथ्वीराज सुतार, दिवंगत माजी महापौैर चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव आनंद छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागुल यांचे चिरंजीव अविनाश बागुल, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे या उमेदवारांच्या कामगिरीबाबतही उत्सुकता आहे.