नेरुळ । दफनभूमीसाठी नियोजित घणसोली गावाच्या नाक्यावरील क्षेत्रफळ 1990.96 चौ. मी., भूखंड क्र 10, सेक्टर 18 हा भूखंड घणसोली दर्गा अथवा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत, राजकिय तसेच शासन-प्रशासनिक पातळीवर विकास संस्था, घणसोली तसेच श्री देवस्थान संस्था (गावकी) घणसोली तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणी श्री देवस्थान संस्थ घणसोली, गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन पातळीवर पत्रव्यवहार करीत आहे. सन 2013 रोजी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन यांना दफनभूमी करता भूखंड मिळावा यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेत ठराव मांडण्यात आला होता, तो ठराव सिडकोकडून भूखंड मिळाल्यानंतर सन 2015 रोजी पारित करण्यात आला व भूखंड असोसिएशनला देण्यात आला. मात्र याच आरक्षित झालेल्या या भूखंडावर जागेवर कुंपण घातले जात आहे, त्यामुळे सर्व गावकरी संतप्त झाले आहेत, त्यामुळे भविष्यात जर तेथे दफनभूमी झालीच तर धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे विकास संस्थेचे म्हणणे आहे.
ज्यावेळी भूखंड हस्तांतरित झाला त्यावेळेस गावकर्यांनी प्रखर विरोध केला होता. त्यानंतर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सहकार्याने फेब्रुवारी 2016 रोजी गावकरी, मुस्लिम वेल्फेअरचे पदाधिकारी, नवी मुंबई महानगर पालिका अधिकारी, सिडको अधिकारी यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी पालिका आणि सिडको यांनी सांगितले होते की, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनला या भूखंडाऐवजी पर्यायी जागा घणसोली दर्ग्याशेजारी उपलब्ध करून देऊ जेथे मुस्लिम वस्ती जास्त प्रमाणात आहे. याबाबत विकास संस्था घणसोली यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक धर्मातील व्यक्तीला अंत्यविधीसाठी सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, ग्रामस्थांचा विरोध हा दफनभूमीला नसून, त्या जागेला आहे; जेथे दफनभूमी प्रस्तावित आहे.
पालिकेचा सिडकोसोबत पत्रव्यवहार, तिढा फक्त जागा बदलाचा
यातील तिढा फक्त जागा बदलाचा आहे, ज्याबाबत, पालिकेने स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने, सिडको सोबत पत्रव्यवहार केलेला आहे. हा भूखंड घणसोली गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने, तसेच त्या जागेशेजारी घणसोली गावाचे तसेच नवी मुंबईतील प्रसिद्ध असे जागृत देवस्थान श्री गवळीदेव मंदिर आहे. तसेच शेतकरी शिक्षण संस्थेची इमारत देखील त्याच ठिकाणी नियोजित असल्याकारणे, दफनभूमी तेथे असणे योग्य नाही अशी घणसोली ग्रामस्थांनी भावना बोलून दाखवली आहे. त्यामुळे घणसोली गावातील नागरिकांनी ग्रामस्थांनी वेळीच यामध्ये लक्ष घालून, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनला पर्यायी जागा; घणसोली दर्ग्या शेजारी उपलब्ध करुन देण्यासाठी राजकिय, शासन- प्रशासन, तसेच मुस्लिम वेलफेअर असोसिएशन सोबत सामंजस्य बोलणी करुन त्यातून तोडगा काढण्याचे ठरविले आहे.