ऐरोली : दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्या वस्तू सरकारने महाग केल्या असून, एलपीजी गॅसच्या किमतीत देखील सरकारने भाववाढ केली असल्याने कमी किमतीत प्रत्येक घरोघरी गॅस मिळावा या दृष्टिकोनातून नवी मुंबई शहरात महानगर गॅसच्या पाईप लाईन टाकण्याचे काम चालू असून कामातील पहिला टप्पा म्हणून ऐरोलीतील विविध सेक्टर मधील सोसायत्यांचे गॅस कनेक्शन चालू कारण्यात आले असून याचा लाभ घणसोली हद्दीतील सर्वच सोसायट्यांना मिळावा याकरिता महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाची सुरुवात वृंदावन सोसायटीपासून झाली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केले.
घणसोली सेक्टर 29 मधील वृंदावन सोसायटीमध्ये महानगर गॅसच्या पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ श्री. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त बोलत होते. माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, जी. एस. पाटील, जी. एस. म्हात्रे, वृंदावन सोसायटीचे राजकुमार राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई शहरात महानगर गॅस च्या पाईप लाईन कामाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून येत्या काही दिवसात गॅस सिलिंडर पासून मुक्तता मिळेल, असा विश्वास महानगरगॅसच्या अधिकार्यांनी व्यक्त केला.