नवी मुंबई । घणसोली गावातील एक 70 वर्षीय वृद्ध नव्या येणार्या वर्षाची दिनदर्शिका एखाद्या तरुणाला लाजवेल अशाप्रकारे गेल्या दोन महिन्यापासून दिवसभर दहा तास पायीपायी फिरून विकत आहे. या वृद्धाची एनर्जी पाहून नागरिकही थक्क होत आहेत. त्यांनी आता पर्यंत 4 हजार दिनदर्शिका विकल्या आहेत. विशेष म्हणजे या मागे त्या वृद्धाची सामाजिक बांधिलकीही दिसून येत आहे. नरसिंह भुजंगराव देशमुख हे गृहस्थ घणसोली गावातील, साई सदानंदनगर येथे आपला मुलगा किशोर देशमुख यांच्याकडे याच कालावधीत वास्तव्यास असतात. नवीन वर्ष सुरू झाले की ते आपल्या मूळगावी सातार्यातील वाई येथे पुन्हा जातात. नरसिंह यांनी आता पर्यंत ठाणे परिसरातील ठाणे स्थानक परिसर, मुंब्रा, नवी मुंबईतील दिघा ते वाशी परिसरातील गल्ली ना गल्लीत फिरून कालनिर्णय व महालक्ष्मी नावाची दिनदर्शिका 2018 या सालाची विक्री केली आहे.
आता पर्यंत चार हजार नागरिकांनी दिनदर्शिका विकत घेतली असल्याचे नरसिंह देशमुख यांनी सांगितले. सकाळी बरोबर आठ वाजता नरसिंह देशमुख आपली बॅग घेऊन पायीपायी दिनदर्शिका विकण्यास निघतात. दुपारचे अडीच वाजले की ते थांबतात. दुपारचे जेवण केले की सायंकाळी पाच वाजता दिनदर्शिका विकण्यास सुरुवात केली की रात्री नऊ वाजता ते आपल्या घराकडे प्रयाण करतात. असा प्रकार त्यांचा गेल्या दोन महिन्या पासून सलग चालू आहे. नरसिंह यांना हृदयाचाही त्रास आहे. परंतु कष्ट केले तर सर्वच रोग पळून जातात. त्यासाठी कोणत्याही रोगाचा बाऊ न करता जितके झेपेल तितकेच काम केले तर नक्कीच आपण त्यावर मात करू असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजच्या काळात नुसता साधा ताप आल्या नंतर अंथरून पकडणार्या साठी नरसिंह देशमुख यांचा सल्ला खरोखरच अंजन घालणारा असल्याचे दिसून येत आहे.
झेपेल तेवढे काम करायचे
आजकाल अनेक कंपन्या, बँका, पतसंस्था, महानगर पालिका, शासनाच्या दिनदर्शिका पाहण्यास मिळतात. परंतु त्यामध्ये भारतीय संस्कृती, सण तसेच इतर कोणतीही माहिती नसते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना या दिनदर्शिका पाहून सर्वच गोष्टींची माहिती मिळते आणि म्हणूनच मी ह्या दिनदर्शिका विकण्याचा प्रयत्न करतो असेही देशमुख यांनी सांगितले. माझ्या घराची परिस्थिती खूप चांगली आहे. मला काम करायची कोणतीही गरज नाही. परंतु रिकामे मनामध्ये सैतांनाचे स्थान असते. त्यामुळे मला झेपेल तेव्हढे काम करतो आणि झेपेल तेव्हढे काम सर्वच वृद्धनी करावे. नाहीत असा सल्ला मात्र त्यांनी वयोवृद्धाना द्यायला ते विसरले नाहीत.