घनकचरा, वाहतूक विषयावर ‘स्वीडन’ची मदत घेतली जाईल

0

पिंपरी-चिंचवड : घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजनात ’स्वीडन’ देश अग्रेसर आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजनाबाबत त्यांची मदत आपल्याला घेता येईल. त्यासाठी स्टॉकहोम सिटी व आपल्या शहरात सामजस्य करार करण्याचा विचार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दौर्‍यातील अनुभवाचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले.

ग्रीन सिटीला प्राधान्य
स्वीडन दौर्‍यावरून हर्डीकर चार दिवसांपूर्वी परतले आहेत. ते म्हणाले, स्वीडनमध्ये ग्रीन सिटीला प्राधान्य देत सिटी स्मार्ट तयार केली आहे. विकासात ग्रीन सिटीला महत्त्व दिले. पर्यटन विकासाला चालना देवून तलाव, रिव्हर फ्रंट, संग्रहालये तयार करून पर्यटकांना आकर्षित केले. घनकचरा व्यवस्थापनात कचरा संकलन व वाहतुकीच्या बाबतीत त्यांचे नियोजन उत्कृष्ट आहे. तेथे कचर्‍यापासून विजनिर्मिती केली जात नाही. तर, थंड व बर्फाळ प्रदेश असल्याने कचर्‍यापासून उष्णता तयार केली जाते.

लोकांच्या निर्णयानुसार प्रकल्प
वाहतूक नियोजनात सार्वजनिक वाहतुकीबरोबर सायकल, भूमिगत मेट्रोसेवा, इलेक्ट्रीक बस, ट्रॅफिक हब, पार्कींग सुविधेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पाच मिनिटांत त्यांची बस चार्ज होते. त्यानंतर ती 60 किलो मीटर धावते. कोणताही प्रकल्प राबविताना लोकसहभागाला प्राधान्य आहे. लोकांच्या निर्णयानुसार प्रकल्प राबविले जातात. तेथील सायन्स पार्कमध्ये नवीन संशोधनाला वाव असतो. तेथे ऑटोमोबाईल व वाहतुकीसंदर्भात नवनवे तंत्रज्ञान विकसित केले जाते. तसेच, संपूर्ण टाकाऊ वस्तू, कचर्‍यापासून बनविलेल्या वस्तूंचा एक संपूर्ण मॉलची संकल्पना तेथे एका पालिकेने राबविली आहे.