घनकचरा व्यवस्थापनाची प्रणाली समजून घ्यावी : डॉ. शास्त्री

0

पुणे । कचरा व्यवस्थापनासाठी अनेक प्रकल्प येत आहेत. परंतु ते दीर्घकाळ टिकत नाही. बायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर ते वर्षानुवर्षे सुरळीतपणे चालतात. यासाठी आपण घनकचरा व्यवस्थापनाची शाश्‍वत प्रणाली समजून घ्यायला हवी, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. समीर शास्त्री यांनी केले.मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत डॉ. शास्त्री यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर विद्यार्थ्याशी संवाद साधला. यावेळी परिषदेचे सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, विज्ञानशोधिकेच्या सहसंचालिका भारती बक्षी आदी उपस्थित होते.

डॉ. शास्त्री म्हणाले, पुण्यातील नद्यांची परिस्थिती, उरुळी देवाची याठिकाणी असणारे कचर्‍याचे ढीग हे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, अनेक प्राणघातक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच निसर्गाला समजायला, वाचायला शिकले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागतिक आणि स्थानिक पातळीवर विचार करून वैयक्तिक उपाय शोधायला हवेत. ‘मी माझं घर कचरामुक्त करणार’ असा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. पुण्यात कचरा व्यवस्थापन केंद्र आणि त्यासंदर्भातील प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कचर्‍याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन नीट व्हायला हवे.

निसर्ग संवर्धनावर लक्ष हवे
आपण जसे क्षमतेपलीकडे काम करू शकत नाही, तसेच निसर्गाचेही आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसर्‍यावर अवलंबून न राहता पुढच्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. निरोगी व स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी कचर्‍याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करायला हवे, असे डॉ. शास्त्री यांनी सांगितले. यावेळी संजय मालती कमलाकर, अशोक सागर उपस्थित होते.