शिक्रापूर येथील छाया दौंडकर या महिलेची आदर्श कहाणी
शिक्रपुर (मंदार तकटे ) :– महिला म्हटले कि घरकाम, शेतीकाम आणि क्वचित काही महिलांचा व्यवसाय यामध्ये महिला अडकून राहतात व त्यामुळे महिलांना मुलांकडे फारशे लक्ष देता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते परंतु शिक्रापूर येथील छाया दौंडकर या महिलेने घरकाम करत आपल्या मुलाला अतिशय चाणाक्ष बुद्धीचा मुलगा बनवून त्याला कलाकार देखील बनविले असून तो लहान मुलगा आपल्या आईचे नाव सर्वत्र झळकवतो आहे.
मुलाला केले कलाकार
गृहिणी म्हणून काम करणारी महिला छाया दौंडकर तिचे शिक्षण फारसे झालेले नाही, परंतु आज त्यांचा सहा वर्षे वयाचा मुलगा यश हा त्याच्या अगदी अडीच वर्षे वयापासूनच विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अगदी एखाद्या सेकंदातच देत आहे, छाया यांनी त्यांच्या मुलाला त्याच्या अंगातील गुण पाहून वयाच्या दुसर्या वर्षापासूनच पतीच्या मदतीने घरी शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली त्यांनतर छाया व तिचे पती राजेंद्र यांनी यशला शिकवत सराव सुरु केले यशच्या अंगातील गुण पाहून त्याला जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सयाजी शिंदे यांच्या सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि आज पर्यंत त्याने चार चित्रपटांनामध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.
दिग्गजांच्या भेटीची संधी
तर यश व त्याच्या आई वडिलांना यशच्या कलागुणामुळे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, लुसि कुरियन यांच्यासह अनेक दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली आहे. अनेकदा टीव्हीवर येण्याचा योग देखील दौंडकर कुटुंबांना यशमुळे आला असून इंटरनेट वर यश दौंडकर नाव टाकल्यास त्यांनी घडविलेल्या मुलाची सर्व कहाणी देखील पाहता येत आहे, परंतु हे सर्व घडविण्यामागे मोलाचा वाटा आहे तो म्हणजे यश या लहानग्याला घडविणार्या त्याच्या आईचा, छाया दौंडकर यांनी घरकाम करूनही मुलाला इतक्या चांगल्या प्रकारे आणि उच्चशिक्षणाप्रमाणे शिक्षण देऊन समाजातील महिलांना अनोखा संदेश दिला आहे.
छरिवाराची वेगळी ओळख
छाया दौंडकर यांच्या कामाची दखल अनेकजण घेत असून इतर महिला देखील त्यांच्या मुलांना छाया प्रमाणे शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आज छाया दौंडकर यांच्या छोट्याशा प्रयत्नामुळे त्यांच्या परिवाराची सर्वत्र वेगळे ओळख निर्माण झाली आणि यशला अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कित्येकदा काही शाळेंमध्ये त्यांना मुलांना वेगळी दिशा देण्याचा मार्ग दाखविण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. यावेळी बोलताना आईने मुलांमधील स्तुप्तगुण ओळखून मुलांच्या गुणांना प्रोत्साहित केले तर नक्कीच सर्व मुले चांगल्या प्रकारे घडू शकतात असे त्यांनी सांगितले आहे. छाया या आज काही बचत गटाचे प्रतिनिधित्व करत असून समाजाला एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण करत स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.