घरकुलच्या गुन्हेगारांना उपचारार्थ दाखल करणे , धुळ्याच्या अधिष्ठांतासह कर्मचार्‍यांना भोवणार

0

घरकुलच्या 6 जणांना उपचारार्थ परस्पर केले होते दाखल ; खंडपीठाने मागविली सीसीटीव्हीसह कागदपत्रांची माहिती

जळगाव – घरकुल घोटाळ्यातील गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनी औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज सादर केले आहे. यात शिक्षा झाल्यानंतर काही गुन्हेगार वैद्यकीय कारण समोर नेत परस्पर धुळे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाले होते. या गुन्हेगारांच्या दाखल झाल्यापासून ते कोणता आजारावर नेमका काय उपचार यासह सीसीटीव्ही फुटेज व कागदपत्रांची खंडपीठाने माहिती मागविली असून चौकशीअंती दोषी धुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह कर्मचार्‍यांवर खंडपीठाकडून कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

40 जणांच्या जामीनावर कामकाज सुरु
घरकुल प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने वेगवेगळी शिक्षा व दंड सुनावला आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी धुळे कारागृहातून नाशिक कारागृहात हलविण्यात आले. या सर्वांनी जामीन व शिक्षा रद्द तसेच स्थगिती करण्यासाठी खंडपीठात धाव घेतली आहे. 48 जणांपैकी सुरेश जैन, राजा मयुर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जावर नंतर कामकाज होणार आहे. रुग्णालयात दाखल यांच्याव्यतिरिक्त उर्वरीत 40 जणांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्या. नलावडे व न्या. सोनवणे यांच्या खंडपीठासमोर कामकाजाला सुरुवात झाली. यात गुन्हेगारांच्या वकीलांचा गुरुवारी युक्तीवाद झाला. शुक्रवारी यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण हे युक्तीवाद करणार आहेत.

उपचार घेणार्‍यांबाबत खंडपीठांची प्रचंड नाराजी
घरकूल प्रकरणाचा निकाल लागल्यापासून वैद्यकीय कारण समोर करत लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे हे उपचारार्थ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. राजकीय दबावातून संबंधित थेट कारागृहात न जाता रुग्णालयात दाखल झाल्याच्या या प्रकाराबाबत खंडपीठाने प्रचंड नाराजी व्यक्त केली. संबंधित उपचार घेणारे मोठे व्यक्ती असून ते राजकीय दबावातून कारागृहात न जाता रुग्णालयात दोन महिन्यांपासून उपचार घेत आहेत, ते कारागृहात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांचे जामीन अर्जावर कामकाज होणार नाही, याशब्दात खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. यानंतर संबंधितांचे वकीलांनी जामीनअर्ज विल्ड्रॉल करुन घेतले.

खंडपीठाने मागविली माहिती
शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात न जाता थेट रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणार्‍या लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, कोल्हे या गुन्हेगारांबाबत खंडपीठाने माहिती मागविली आहे. लता भोईटे यांना डीचार्ज देण्यात आला आहे. मात्र त्यांच्याासह इतर उपचार घेणार्‍यांची 31 ऑगस्ट रोजी दाखल झाल्यापासूनचा सीसीटीव्ही फुटेज, संबंधितांच्या आजाराबाबत तसेच उपचाराबाबतची कागदपत्रे यासह संपूर्ण माहिती खंडपीठाने मागविली आहे खंडपीठाकडून चौकशी होवून दोषी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांसह कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. खंडपीठात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण हे कामकाज पाहत आहे.