मनपा प्रशासनाने मागविला विधी सल्लागारांकडून अभिप्राय
जळगाव- राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाण्यात धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यात विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे यांचा समावेश आहे. त्यामुळे मनपाच्यावतीने अपात्रतेची कारवाई करण्यासाठी मनपाचे विधी सल्लागार यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
घरकुल घोटाळाप्रकरणी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी,नगरसेवकांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यात काही जणांचा जामीन मंजूर झाला आहे.मात्र शिक्षेला स्थगिती मिळाली नाही.त्यामुळे घरकुलातील विद्यमान पाच नगरसेवकांविरूध्द काय कारवाई केली याचा जाब माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकारात विचारल्याने मनपा अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अपात्रतेची कारवाई करण्यासाठी मनपाचे विधी सल्लागार यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आले आहे. विधी सल्लागारांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे यांच्याविरुध्द अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.