घरकुलमुळे नगरसेवक प्रचंड घाबरले

0

आर्थिक ठराव करण्याचीही हिम्मत होईना,स्थायी समितीत पडसाद

जळगाव- घरकुल’ निकालामुळे महापालिकेतील सर्वच नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.त्यानुसार आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक घाबरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. भाजपकडून दोन प्रस्तावांना स्थगिती तर प्रत्येक प्रस्तावार शिवसेना व एमआयमचे तटस्थ राहण्याचा सावध पवित्रा घेताना दिसून आले.दरम्यान,यापूर्वीच दैनिक जनशक्तिने निकालानंतर भाजप नगरसेवकांमध्ये घबराट ’या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते.
महापालिकेची स्थायी समितीची सभा समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजीत मुठे, उत्कर्ष गुटे, मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरससचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
घनकचरा प्रक्रियेचा प्रस्ताव स्थगित
घरकुल घोटाळ्याचा निकालाचे मनपात उमटले.घरकुलची धास्ती नगरसेवकांनी घेतल्याचे आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत दिसून आले. घनकचरा प्रक ल्पात ठिकाणावरील साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावर भाजपा सत्ताधार्‍यांनी मक्तेदाराच्या कामांची माहिती घेवून पुढील सभेत विषय घ्यावा. तसेच घनकचरा प्रकल्प नवीन उभारणीच्या कामाचे टेंडर प्रक्रियेवर मुद्दे घेत दोन्ही प्रस्ताव स्थगीत ठेवण्याची भूमिका घेतली तर शिवसेना एमआयएमच्या सदस्यांनी देखील प्रत्येक विषयाला तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
ठराव करतांना सतर्क राहणे आवश्यक-उज्जवला बेंडाळे
कचरा प्रक्रियेच्या बायोमायीनच्या प्रस्तावर भाजप सदस्य उज्वला बेंडाळे यांनी हरकत घेतली. कराड व पंढरपुर महापालिकेत या मक्तेदाराने बायोमायनींगचे काम अपूर्ण केले आहे. त्यामुळे मक्तेदाराच्या कामांची माहिती घेवून पुढील सभेत हा विषय घ्यावा. काही दिवसापासून घडामोडीमुळे आपण सतर्क रहाणे आवश्यक असून अडचणीत येणारे प्रस्ताव सभेत नको असे उज्जवला बेंडाळे म्हणाल्या.
सर्वच नगरसेवक विचलित- सुनील खडके
भाजपचे नगरसेवक सुनील खडके यांनी उज्जवला बेंडाळे यांचे समर्थन केले. तीन दिवसापूर्वी घरकुल घोटाल्याचा निकाल लागला. हा निकाल सर्वांना विचार करायला लावणारा असल्याने सर्वांचे मन सध्या विचलित आहते. त्यामुळे पत्रिकेवरील प्रत्येक प्रस्ताव हे विचारपूर्वक व अभ्यास करून आले पाहिजे अशी भूमिका मांडली.
नो वर्क नो मिस्टेक’ ची भूमिका घेवू नका – आयुक्त
स्थायी सभेत सभापतींनी प्रस्ताव स्थगित ठेवण्याची सूचना मांडली.त्यावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे म्हणाले, घडलेल्या घटना नक्कीच विचार करणार्‍या असल्यातरी शहरातील विकास कामांबाबत पदाधिकारी व अधिकार्‍यांना काम जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. त्यामुळे ‘ नो वर्क नो मिस्टेक’ या भूमिकेकडे न पाहता सदस्यांनी प्रस्तावांना मंजूरी द्यावी, आचारसंहितेपूर्वी या कामांना कार्यादेश देणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बड्या थकबाकीदारांचे काय -विष्णू भंगाळे
शहरातील बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावाच्या प्रस्तावर विष्णू भंगाळे म्हणाले, की ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जाहीर लिलाव आहात, त्यांची ऐवढी मोठी थकबाकी आहे का ? ज्यांच्याकडे करोडो रुपये घेणे आहे त्यांची मालमत्ता जप्त केव्हा करणार असा सवाल विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेची तटस्थची भूमिका
स्थायी सभेत प्रत्येक विषयाला तटस्थ राहण्याची भूमिका का घेत आहात असे सत्ताधार्‍यांनी शिवसेना नगरसेवकांना विचारणा केली. यावर विष्णू भंगाळे आणि नितीन यांनी होय, आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले.
महावितरणच्या विषयावरुन बरडेंनी धरले धारेवर
महावितरणला सुपरविझन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी आजपर्यंत काय केले असा प्रश्‍न नितीन बरडे यांनी उपस्थित केला. काहीही न करता आपण त्यांना मोबदला का देतो अशी भूमिका मांडून बरडे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.