घरकुलसाठी विशेष मोहिम राबवा

0

धुळे । जिल्ह्यात घरकूल योजनांची कामे विशेष मोहीम राबवीत तत्काळ पूर्ण करावीत. जिल्हा डिसेंबर 2017 अखेर हागणदारीमुक्त होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिले. जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सकाळी पालकमंत्री ना.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदनाताई गुजर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, नाशिक विभागीय महसूल कार्यालयातील विकास व आस्थापना विभागाचे उपायुक्त श्री. मित्रगोत्री आदी उपस्थित होते.

योजनांचा आढावा
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल होत आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामुळे डिजिटल शाळांचा उपक्रम अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असेही पालकमंत्री ना.भुसे यांनी नमूद केले. यावेळी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान, स्वच्छ भारत अभियान, जनसुविधा योजना, 14 वा वित्त आयोग, राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजना, आरोग्य, जलयुक्त शिवार अभियान, सर्व शिक्षा अभियान, पेसा, तीर्थक्षेत्र विकास योजना, महिला व बालकल्याण, कृष आदी विभागांचा सविस्तर आढावा पालकमंत्री ना.भुसे यांनी घेतला.

मुंबई येथे उपचार
स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे जिल्हा डिसेंबर 2017 अखेर हागणदारीमुक्त करावयाचा आहे. याबाबत दर आठवड्यास आढावा घेवून नियोजन करावे. 14 व्या वित्त आयोगांतर्गत लहान- लहान आर. ओ. प्लाँटच्या माध्यमातून शुध्द पाणीपुरवठा करता येईल याची तपासणी करावी. तसे झाल्यास ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होवू शकतील. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. या तपासणीत गंभीर आजाराचे रुग्ण आढळून आले, तर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णांलयांमध्ये उपचार करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

जानेवारीपर्यत काम व्हावे
घरकूल योजनेची काही कामे अपूर्ण दिसत आहेत. ही कामे विशेष अभियान राबवून पूर्ण करावयाची आहेत. जानेवारी 2018 अखेर ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमितपणे आढावा बैठक घ्यावी. या योजनेच्या माध्यमातून वंचितांना घरकूल मिळणार आहे. त्यामुळे कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजे असे ना.भुसे यांनी यावेळी सांगितले.