बी.जी.पाटील यांचा इशारा ; रावेर पंचायत समितीत बैठक
रावेर- प्रधानमंत्री आवास व राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभार्थींना प्रथम हप्ता देऊनसुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करणार्या लाभार्थींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकारी व रावेरचे घरकुल संपर्क अधिकारी बी.जी.पाटील यांनी येथे दिला. रावेर पंचायत समितीच्या हॉलमध्ये पाल-के-हाळा व ऐनपूर-खिरवड जिल्हा परीद गटाची बैठक शुक्रवारी झाली. प्रसंगी तालुक्याचे संपर्क अधिकारी पाटील यांनी घरकुलासंदर्भात ग्रामसेवकांकडून आढावा घेत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याची सूचना दिल्या. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनीदेखील ग्रामसेवकांना घरकुलाची कामे 31 जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या कामांन हलगर्जीपणा करणार्या ग्रामसेवकांवर कारवाईचा सूचक इशाराही देण्यात आला. या बैठकीला विस्तार अधिकारी सी.एस.महाले, बाह्य गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती बांधकाम अभियंता व ग्रामसेवक उपस्थित होते. दरम्यान, शनिवार , 29 रोजी खिरोदा-चिनावल, विवरे-वाघोड तर रविवार, 30 रोजी निंभोरा-तांदलवाडी, मस्कावद-थोरगव्हाण जिल्हा परीषद गटनिहाय घरकुल संदर्भातील बैठक संपर्क अधिकारी पाटील घेणार आहेत.