घरकुलासाठी जागा मंजुरीनंतर दगडी मनवेलच्या लाभार्थींची वणवण

0

जागा नावावर होण्यास दिरंगाई ; प्रशासनाकडे लेखी तक्रार

यावल- तालुक्यातील दगडी मनवेल येथे 43 पात्र लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश प्राप्त असून दोन वर्षे होऊनही या जागा त्यांच्या नावावर करून देण्याची कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने लाभार्थींची कुचंबणा होत आहे. या मागणीबाबत तहसीलदार व यावल पंचायत समितीच्या बीडीओंना निवेदन देण्यात आले. मनवेल येथील ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दगडी व मनवेल येथे 43 पात्र लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव यांचे 13 ऑक्टोबर 2016 रोजी आदेश प्राप्त झाले मात्र दोन वर्षे होऊनही लाभार्थींना जागा नावावर करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून पूर्ण झालेली नाही. या लाभार्थींचे नाव सन 2002 ते 2007 च्या दारीद्य्र रेषेखालील यादीत नाव होते. गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंजूर केलेली जागा त्याला लाभधारकांच्या नावावर जागा लवकरात लवकर करून देण्यात द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आणि सरपंच नरेंद्र जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. तहसीलदार कुंदन हिरे आणि यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना निवेदन याबाबत निवेदन देण्यात आले.