घरकुल अनुदानासाठी दालनात टाकले दगड

0

बीड । पाटोदा येथे घरकुलाचे वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत सोमवारी दुपारी गटविकास अधिका-यांच्या दालनांत दगड टाकले.

शासनाने इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीघरकुल 1 लाख रु देण्याचा निर्णय तिन वर्षांपूर्वी घेतला आहे. तत्पूर्वी प्रतीघरकुल 70 हजार रु देण्यात येत होते. हा निर्णय होऊन तीन वर्ष उलटून गेल्यानंतरही प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे लाभार्थी या वाढीव अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे संतप्त लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनुदान तातडीने मिळावे यासाठी अनोखे आंदोलन करत गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात दगड आणून टाकले.

या घटनेनंतर गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी लोकजनशक्तीच्या आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. त्यावेळी मोरे यांनी पंचायत समितीचे लेखाअधिकारी निवृत्त झाले असल्याने हा निधी प्रलंबित झाला अशी माहिती दिली. तसेच नवे लेखाअधिकारी रुजू झाल्यानंतर लवकरात लवकर धनादेश देण्याच्या लेखी आश्वासनानंतर लोकजनशक्ती पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.