जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार
जळगाव-घरकुल खटल्यासाठी अॅड.प्रवीण चव्हाण यांना वगळून मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती.अॅड.सावंत यांच्या नियुक्तीवर हरकत घेवून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. दरम्यान,अॅड. सावंत यांनी राजीनामा दिला असून शासनाने मंजूर केला आहे.त्यामुळे आता घरकुलचे कामकाज अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याकडे असण्याची शक्यता आहे.
घरकुल खटल्यात धुळे न्यायालयाने माजी आ.सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी,राजा मयुर,मेजर नाना वाणी,प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे,माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना शिक्षा सुनावली.त्यानंतर आरोपींनी मुबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.याप्रकरणी सरकारतर्फे कामकाज पाहण्यासाठी मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.अमोल सावंत यांची नियुक्ती केली तर त्यांचे सहाय्यक म्हणून अॅड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती केली होती. दरम्यान,अॅड.सावंत यांच्या नियुक्तीचा निर्णय अयोग्य व संशयास्पद असल्याचा आरोप करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.तसेच अॅड.सावंत यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी केली होती.याप्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड.सावंत यांनी राजीनामा दिला असून शासनाने राजीनामा मंजूर केला.यासंदर्भात अॅड.सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.
घरकुल खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.मात्र या खटल्यासाठी वेळ देता येत नाही आहे.वेळेची अडचण येत असल्यामुळे राजीनामा दिला आहे.
-अॅड.अमोल सावंत
अॅड.प्रवीण चव्हाण कायम असण्याची शक्यता
घरकुल खटल्यात अॅड.प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी म्हणून यशस्वीपणे कामकाज पाहिले.त्यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादामुळे धुळे न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.मात्र त्यानंतर मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.दरम्यान,अॅड.सावंत यांनी विशेष सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता घरकुलच्या कामकाजाची जबाबदारी अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.