घरकुल घोटाळा: जनतेचा पैसै लुटला, कर्तृत्वाचे फळ मिळाले: अण्णा हजारे

0

डॉ.गोपी सोरडे जळगाव: घरकुल घोटाळ्यातील आरोपींनी जनतेचा पैसा लुटला. त्यामुळे त्यांना कर्तृत्वाचे फळ मिळाले.सत्य हे सत्यच असतं.‘भगवान के घर मे देर है,अंधेर नही’ अशा शब्दात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घरकुल घोटाळ्याच्या निकालानंतर दैनिक ‘जनशक्ति’शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

अण्णा म्हणाले की,तत्कालीन जळगाव नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांच्यासह आजी-माजी नगरसेवक ,पदाधिकारी आणि खान्देश बिल्डर्स यांनी घरकुल योजनेत घोटाळा केल्यामुळे चैकशीसाठी मागे लागलो होतो. मात्र मागच्या सरकारने चौकशी टाळली. त्यामुळे 2004-2005 मध्ये चौकशीच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले. मी केलेल्या आंदोलनामुळेच सरकारने सावंत आयोगाची नेमणूक केली. सावंत आयोगाने चौकशी केली. या चौकशीत बरेचसे पुरावे मिळाले असल्याचे अण्णांनी सांगितले.

आझाद मैदानावर दोघांच्याही उपोषणाचे मंडप
घरकुल घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी माझ्या मंडपच्या बाजूला सुरेशदादांनी देखील उपोषण सुरु केले असल्याचे अण्णांनी सांगितले. पहिल्या उपोषणानंतर चौकशी झाली.परंतु कारवाई झाली नाही.त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

शेवटी सुरेशदादांचे मंत्रीपद गेले
घरकुलप्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन सुरु केले. त्यावेळी सुरेशदादा गृह निर्माण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते.दुसर्‍यांदा केलेल्या आंदोलनामुळे सुरेशदादा यांचे मंत्रीपद गेले असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

अधिकार्‍यांची महत्त्वाची भूमिका
घरकुलचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही एकाही अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला नाही.मात्र तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले. त्यानंतर तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांनी धाडस करुन पुरावे बाहेर आणले.तर सरकारी वकिलांनीही न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली.अधिकार्‍यांसोबतच स्व.नरेंद्रअण्णांचीही महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्‍वास आहे.शेवटी सत्य हे सत्यच असतं असेही ते म्हणाले.

काँग्रेस सरकारवर ताशेरे
घरकुल प्रकरणी सन 2004-2005 मध्ये चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.मात्र काँग्रेस सरकारने चौकशी टाळली असा आरोप करत अण्णांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले.