घरकुल प्रकल्पामध्ये अवैद्य धंद्यांमध्ये वाढ

0

पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी नागरिकांची मागणी

पिंपरी : झोपडपट्टीवासियांचे जीवन सुधारावे यासाठी महापालिकेने त्यांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शहरात राबविले आहेत. अनेक ठिकाणी झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर होऊन ते घरकुलच्या इमारतीत रहायला गेले आहेत. मात्र चिखली, घरकुल परिसरातील नागरिकांनी इमारतीच्या परिसरातच हातगाडे टाकून व्यवसाय सुरु केले आहेत. तसेच धूळखात पडून असलेल्या इमारतीमध्ये अवैद्य धंद्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाद आणि गुन्हेगारीचे स्वरूप चिखली घरकुल परिसराला येत आहे.

चिखली परिसरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविलेला आहे. या प्रकल्पामध्ये महापालिकेने अनेक झोपडपट्टीवासियांना स्थलांतरीत करून राहण्यासाठी सोडत घेऊन फ्लॅट ताब्यात दिले आहेत. मात्र हाताला काम नसणार्‍यांनी ज्या ठिकाणी राहण्यासाठी घर आहेत, त्याच ठिकाणी धंदापाणी सुरु केले आहे. त्यामुळे अनेक हातगाड्या टपर्‍यांचा विळखा या घरकुल परिसराला पडला आहे. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक कोंडीमुळे पीएमपीएलची बस घरकुलमध्ये जाऊ शकत नाही. तसेच वाढत्या टपर्‍यांच्या विळख्यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढलेच आहे. त्यासोबत वादाचे प्रमाणही वाढले आहे. भाजीपाल्याच्या गाड्या, पानमसाला, चहा-सिगारेटच्या टपर्‍या, विविध वस्तूंचे गाडे या घरकुलच्या आतमध्ये आहेत. एका व्यक्तीने आज भाजीपाला किंवा दुसरी टपरी सुरु केली की, दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी वाद घालून बाजूला टपरी सुरु करताना दिसतोय. त्यामुळे भांडणाची आणि टपर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

पोलिस चौकी उभारण्याची मागणी
यासंदर्भात संबंधित प्रभागाचे नगरसेवक आणि पक्षनेते एकनाथ पवार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, घरकुलधारकांना महापालिकेकडून सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. घरकुल धारकांसाठी नुकतेच सांस्कृतिक सभागृह महापालिकेने उपलब्ध करून दिले आहेत. यासोबतच या नागरिकांसाठी दवाखाना, ग्रंथालय तसेच प्रकल्पातील मोकळ्या इमारतीतील फ्लॅटचे लवकरच वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. घरकुल प्रकल्पातील वादाच्या अनेक गोष्टी कानावर येत आहेत. मात्र या वादाचे रूपांतर गुंडगिरीमध्ये होऊ नये यासाठी पोलिस गस्त वाढवण्यासाठी मागणी कऱण्यात आली आहे. यासोबतच या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.

क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे घरकुल प्रकल्पातील नागरिकांसाठी महापालिकेकडून सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच याठिकाणच्या भाजीमंडईचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेला पाठवला आहे.