धुळे। शिंदखेडा तालुक्यातील दराणे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक बाबुलाल गोविंद पवार याला इंदिरा आवास योजेनेच्या लाभार्थ्यांचे 3 लाख 85 हजार रुपयांचे अनुदान स्वतःच्या नावे वर्ग करीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि शिंदखेडा पंचायत समिती अंतर्गत सुरु असलेल्या गैरप्रकारांचा आणखी एक नमूना समोर आला आहे. धुळे जिल्हा परिषदेतील आमदाराला लाच देण्याचे प्रकरण सध्या गाजत असतांनाच शिंदखेडा पंचायत समितीच्या अंतर्गत तालुक्यातील दराणे येथील इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थी गरीब महिलेसह 19 लाभार्थ्यांचे तब्बल 3 लाख 85 हजार रुपये परस्पर हडप केल्याचा गंभीर प्रकार चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी बाबुलाल गोविंद पवार रा.दराणे ता.शिंदखेडा जि.धुळे या ग्रामरोजगार सेवकाविरुध्द गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. याप्रकरणी शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिमराव बाबुराव गरुड यांनी फिर्याद दिली आहे.
शासनाच्या इंदिरा आवास योजनेतंर्गत शिंदखेडा पंचायत समितीने सन 2014-15 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत दराणे येथील लिलाबाई नगराज पाटील यांच्यासह 19 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन त्याच्या बांधकामापोटी देण्याचे एकुण 3 लाख 85 हजाराच्या अनुदानाचे विवरण पत्र ग्राम रोजगार सेवक बाबुलाल पवार यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देांडाईचा, शिंदखेडा आणि बॅक ऑफ इंडियाच्या चिमठाणे या शाखांमध्ये जमा करण्यास दिले होते. या विवरण पत्रावर खाडाखोड करीत व्हाईटनर लावून ग्रामसेवक बाबुलाल याने खर्या लाभार्थ्यांच्या बँक खाते नंबराच्या जागी स्वतःच्या बँक खात्याची तसेच इतरांच्या बँक खात्यांचे नंबर टाकून ते अनुदानाचे पैसे त्या खात्यांवर वळते करुन शासकीय अनुदानाच्या 3 लाख 85 हजार रुपयांचा अपहार केला. हा सर्व प्रकार दि. 26/8/ 2014 ते 15/1/15 दरम्यान घडला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी नंदकुमार विष्णुपंथ राठोड यांनी चौकशी करुन आपला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांसमोर मांडला होता. त्या अहवालाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गुन्हा दाखल करीत कारवाईचे आदेश दिल्याने शिंदखेडा पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यांनी पोलिसात फिर्याद दिली.