नाव न देण्यासाठी 350 घरकुल वासियांच्या सह्यांचे पत्र
पिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महापालिकेने 2014 रोजी हा प्रकल्प पूर्ण केला. सध्या 5 हजार 460 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. या घरकुल प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव नुकताच ‘फ’ प्रभाग समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. या संदर्भात संविधान दिन सोहळा समिती घरकुलच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले.
हे देखील वाचा
स्थानिक पुढार्यांचे नामकरण नको…
“से. नं. 17 व 19 येथील घरकुल प्रकल्पाच्या प्रवेशद्वारास कोणत्याही जाती-धर्माच्या देव-देवतांचे तसेच राजकीय पक्षांच्या हयात असलेल्या किंवा हयात नसलेल्या नेत्यांचे नाव न देता कोणत्याही एका महामानवाचे नाव द्यावे, कारण हा प्रकल्प भारत सरकारने ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजने’अंतर्गत राबविला आहे. त्यानुसार या प्रकल्पाला कोणत्याही राजकीय नेत्यांचे अथवा स्थानिक पुढार्यांचे नामकरण करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर ही नावे घरकूल संकुलाला देण्यासाठी सूचविण्यात आली असून 350 घरकुल वासियांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले आहे.