घरकूल योजनेचा लाभ मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन

0

 मुक्ताईनगर : तालुक्यातील चिंचोल येथील ग्रामस्थांनी घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या दालनात तसेच पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले. घरकूल बांधण्यासाठी जागेचा उतारा मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. मात्र माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी मध्यस्थी करुन ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

रहिवासी जागेवर भोगवटा लावून मिळावा
चिंचोलमधील काही कुटुंबे गेल्या 30 वर्षांपासून पाच एकर खळवाडी जागेमध्ये वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे सरकारी सेवा अंतर्गत रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आहे. त्यांना ग्रामसभेत घरकुलासाठी गावठाणची जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तरीदेखील घरकुलाचे प्रस्ताव मंजूर होत नव्हते. तसेच रहिवास असलेल्या जागेवर भोगवटा लावून मिळत नसल्याने या ग्रामस्थांना अन्य सुविधादेखील मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी योगेश कोलते व पंचायत समिती सभापती राजू माळी, मुक्ताईनगर सरपंच ललित महाजन, गणेश चौधरी यांच्या उपस्थितीत तहसिलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन दिले व घरकुलासाठी रहिवासी जागेला भोगवटा लावून उतारे देण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामस्थ संतोष सोनवणे, आनंदा सुर्यवंशी, मधुकर ठाकूर, बाळू कोळी, मिराबाई सोनवणे, निर्मलाबाई माळी, वैशाली तायडे, गयाबाई सुरळकर आदींनी तहसिल दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले.

तहसिलदार कुवर यांनी गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे यांना यावर तोडगा काढण्याची सुचना केली. त्यानुसार पंचायत समिती कार्यालयात चर्चा चालू असतांना माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचे आगमन झाले. त्यांनी सभापती दालनातील बैठकीत आठ दिवसांचे आत घरकुलांचे प्रस्ताव तयार करण्याची सुचना दिली.

तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाविरुध्द तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला. चिंचोल येथे गेल्या 30 ते 34 वर्षांपासून रहिवासी असूनदेखील ग्रामसेवक के.आर. भगत रहिवासी दाखले देत नसल्याची तक्रार केली. यानुसार गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवक भगत यांना भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली.