घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले- जयश्री अहिरराव

महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’

जळगाव – संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरू असून सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार असून अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरांसमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार आहे. महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी गणरायाने ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी भाजपच्या वतीने राज्यात सर्वत्र हे ‘साकडे आंदोलन’ करण्यात येईल. महिलांचा सन्माम राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र, ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना अनेक कुटुंबे अत्याचारांच्या भयाने धास्तावली असून त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे, त्यामुळे आता गणरायानेच महिलांना अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना यावेळी केली जाईल, अशी माहिती माजी महापौर व भाजप प्रदेश महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी गुरुवारी दिली.
पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही, उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ केला जातो. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते, आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणार्‍यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी अशी प्रार्थना बंद मंदिरासमोर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहात निष्क्रिय राहिलेल्या ठाकरे सरकारला आता गणरायानेच सुबुद्धी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले असून घरात बसून स्वतःचे तोंड लपविणार्‍या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का? असा सवालही जयश्री अहिरराव यांनी उपस्थित केला आहे.