प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा उपक्रम
निगडी : दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड शहरात ई कचर्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सन 2012 पासूनच्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाच्या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की शहरातील ई कचर्याने कोटीच्या संख्येने उड्डाण घेतले आहे.सन 2012 पासूनची आकडेवारी व त्या संबधित आलेख अहवालामध्ये स्पष्ट केलेला आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी पाहणी केल्यानंतर काही महत्वाचे मुद्दे निदर्शनास आणले आहेत. ई कचर्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे समितीच्यावतीने घरगुती ई कचर्याचे संकलन केंद्र प्राधिकरण येथे सुरु करण्यात आले आहे.
यासाठी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, जैन सोशल ग्रुप डायमंडचे अध्यक्ष सुनिल शहा, कार्याध्यक्ष साधना शह, सचिव अतुल धोका, सहसचिव प्रशांत गांधी, उपाध्यक्ष पंकज गुगले, खजिनदार पंकज चोपडा, पत्रकार हृषीकेश तपशाळकर, संतोष छाजेड, कमलेश भळगट, राजेश ताथेड, प्रशांत गांधी, अनुप शहा, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, बाबासाहेब घाळी, पोलीस नागरिक मित्रचे अनिल पालकर, अशोक तनपुरे, अमित डांगे, संतोष चव्हाण, अमोल कानु आदींनी पुढाकार घेतला.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटीच्या सर्वेक्षणात काही गोष्टी नजरेस आल्या आहेत. शहरामध्ये जमा होणार्या घन कचर्यामध्ये ई कचर्याचे प्रमाण 2 ते 5 टक्के आहे. ई कचर्यामध्ये पारा, शिसे, कॅडमियम, रासायनिक रिटारडंट्स, बेरीयम, लिथियम अशा प्रकारचे घातक रासायनिक पदार्थ जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. अशा घातक रासायनिक पदार्थांमुळे जन्मतः अपंगत्व येणे, मेंदू विकार, हाडांचे रोग, हृदयरोग, स्वादुपिंड, मूत्रपिंड रोग असे आजार उद्भवत आहेत. ई कचरा जाळल्यामुळे हवेमध्ये घातक अश्या डायऑक्सिन धुराची निर्मिती होते. अशा धुरामुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. यामुळे जमिनिखालील पाणीसाठी दूषित होत आहे. तसेच नदीकाठचा (इंद्रायणी/ पवना) परिसर नापीक होत आहे.
भोसरी, हिंजवडी, पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव परिसरातील औदयोगिक ई कचर्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट सद्यस्थितीत होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये 100 टक्के शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी तसेच जैन सोशल ग्रुप डायमंड, पोलीस-नागरिक मित्र, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम या संस्थांनी इ-कचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेतला आहे.