घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी

0

जळगाव । सर्वसामान्य नागरिक वापरत असलेले घरगुती गॅस सिलेंडरची प्रचंड मोठी दरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर निषेध जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात केला आहे. जनतेला विश्‍वासात न घेता दरवाढ करणे म्हणजे लोकशाही देशातला मनमानी शासन करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईल व गॅस यांचे दर स्थिर असतांना अचानक केलेली दरवाढ हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय असल्याचे निवेदनात पुढे म्हटले आहे. जीवनाश्यक वस्तुंचे दर वाढवतांना सामान्य गोरगरीब जनतेचा विचार करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गॅस सिलेंडरची दरवाढ मागे न घेतल्यास मनसेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

रस्त्यावर चुल मांडून अभिनव पद्धतीने आंदोलन
मनसेतर्फे गॅस दरवाढी विरोधात अभिनव पद्धतीने आपला विरोध नोंदविला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील रस्त्यांवर गॅस सिलेंडेर उलटे मारून तेथेच चुल पेटविली होती. बिरबलने शिजवलेल्या खिचडीची आठवण यावी यापद्धतीने उंच ठिकाणी भांडे लावून त्या भांड्याखाली आग पेटविली होती. या अभिनव आंदोलनाची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा पहावयास मिळाली. निवेदनावर मनसे जिल्हासचिव अ‍ॅड. जमील देशपांडे, शामभाऊ दिक्षित, अनंत जोशी, दिलीप सुरवाडे, जितेंद्र करासिया, संदिप मांडोळे, आशिष सपकाळे, सुरज पवार, राजेश गुप्ता, वैशाली विसपुते, निता राणे, शितल माळी, शोभा कोळी, हर्षाली पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.