नोव्हेंबरमध्ये 934 रुपयांपर्यंत पोहोचले गॅस सिलेंडर
पिंपरी चिंचवड : दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असल्याने घरगुती गॅस सिलेंडरने दर वाढीचा भडका घेतला आहे. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आठ महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल 289 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यातुलनेत देशांतर्गत पेट्रोल- डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरातही सातत्याने वाढ होत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा दर एप्रिलमध्ये 645 रुपये होता. जूनमध्ये तो 691, ऑगस्टमध्ये 784, तर नोव्हेंबरमध्ये 934 रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतच 289 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार एकीकडे लाकूडफाट्यामुळे प्रदूषण होऊ नये, म्हणून घरगुती सिलिंडरच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे सिलिंडर महाग होत आहे. मोठ्या कुटुंबाला महिन्याला दोन सिलिंडर लागतात. त्यांची जास्तच आर्थिक कोंडी होत असून केरोसीन मिळणेही दुरापास्त झाल्याची चर्चा सध्या
नागरिकांमध्ये सुरु आहे.
कोट…
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती उतरल्या आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी न होता उलट वाढत आहेत. सरकार एकीकडे केरोसीनमुक्तीकडे वाटचाल करण्यास सांगत आहे. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. शंकर पाटील, नागरिक.