भागवत कुटुंबीयांनी पाणी फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारला देखावा
सांगवी : महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी पर्यावरणाचा र्हास रोखून अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. हाच संदेश समाजात दिला जावा, या उद्देशाने घरगुती गणपती देखाव्याच्या माध्यमातून जुनी सांगवी येथील कैलास भागवत यांच्या कुटुंबीयांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा‘ या विषयावर अप्रतिम देखावा साकारला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विषयावर पाणी फाउंडेशन करत असलेल्या जनजागृतीचा त्यांनी आदर्श घेतला आहे.
काकडदरा ग्रा.पं.च्या कामाचे वास्तव
डोंगराळ भागात असलेल्या वर्धा जिल्ह्यातील काकडदरा ग्रामपंचायतीने पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने केलेल्या कामाचे वास्तव या देखाव्यातून मांडण्यात आले आहे. एका बाजूला पाण्याचे नियोजन तर दुसर्या बाजूला पाण्याअभावी ओसाड शेत दाखविले आहे. त्यासाठी डोंगर उतारावर बंधारे, तळे, समतल चर, पाझर तलाव बांधले तर विहिरी, हातपंपांना व नद्यांना पाणीपुरवठा जास्त काळ उपलब्ध होईल. पाणलोट क्षेत्रामुळे गावाचा कसा कायापालट झाला आहे, हे प्रत्यक्ष देखाव्यातून सादर करण्यात आले आहे. देखाव्यासाठी शीतल भोसले, तेजल पटेल, प्रदीप गाडवे, मोनिका शेलार, नयन झगडे यांना कैलास भागवत यांनी मार्गदर्शन केले आहे.