घरच्यांच्या जाचाला कंटाळून अक्षयने स्वतःचेच केले अपहरण 

0

रेल्वेने गाठली मुंबई नगरी ; अक्षय परतला घरी

फैजपूर (प्रतिनिधी)- अक्षय तू काहीतरी कामधंदा कर हा घरच्यांचा आग्रह असलेल्या तगाद्याला कंटाळूनच फैजपूर शहरातील कोळी वाड्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा अक्षय समाधान कोळी याने स्वतःचा अपहरणाचा बनाव करून पोलीस यंत्रणेसह सर्वांची झोप उडवून दिली. मुंबईनगरी गाठून घरवापसी करत हा तरुण सोमवारी सायंकाळी पोलिसात हजर झाला व त्याने सांगितलेल्या माहिती वरून  बनावट अपहरणाचे बिंग फुटले आणि सिनेमातील एखादी कथाच त्याने त्याच्या बाबतीत सांगितली. रविवारी सकाळी 10 वाजता अक्षयचे अपहरण झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बकऱ्या चारून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करणारा अक्षय समाधान कोळी याने काहीतरी काम धंदा करावा हा उद्देश धरून घरच्यांकडून सतत त्याच्याकडे तगादा लावला जात होता. रविवारी सकाळी त्याचा मित्र सोनू भिल याच्यासोबत भुसावळ रोडवरील जगनाडे नगरमधील वीट भट्ट्याजवळ अक्षय हा बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र सोनू भिल याला माझे अपहरण झाल्याचे घरच्यांना सांग आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीत  दोन इसमांनी अपहरण केल्याचा बनाव केला व एकटाच रिक्षाने भुसावळ जाऊन तेथून जळगांव येथे गेल्यावर रेल्वेने मुंबई गाठली इकडे मात्र मित्राने अक्षयचे अपहरण झाल्याची धूम ठोकली व सर्वत्र एकाच खळबळ उडाली.पोलीस यंत्रनेने ही तपासाची चक्र जलद गतीने फिरवली होती. मात्र अक्षय मुंबईत गेल्यावर त्याला पुढचे काही सुचत नसल्याने त्याने कल्याण रेल्वे स्थानकावरून एका प्रवाशाच्या मदतीने भ्रमणध्वनिवरून घरी संपर्क केला व आपण कल्याणमध्ये असल्याचे सांगत सायंकाळपर्यंत घरी पोहचेल, अशी माहिती परीवाराला दिली. परिवाराने तातडीने पोलिसांना माहिती दिली त्यामुळे परिवारासह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी रेल्वेने अक्षय हा सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान घरी पोहचला त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व फौजदार रामलाल साठे यांनी दिली.
अक्षय अपहरणाची बातमी अखेर खोटीच 
अक्षय याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता मात्र तो कितपत योग्य होता हे शहानिशा न करताच  अपहरणाची बातमी सोशल मिडियावर काही महाशयांनी  वाऱ्यासारखी पसरवली त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्षात घटना खोदा पहाड निकाल चुव्वा अशीच झाली. पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घटनेची पूर्ण माहिती घेऊनच सोशल मिडीयाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.