घरफोडीचा डाव उधळला : सतर्क रहिवाशांना अट्टल चोरट्याच्या चोरी करताना आवळल्या मुसक्या

रामायण नगरवासीयांची सतर्कता : घरफोडी करताना रहिवाशांना जाग आल्याने मध्यरात्री चोरट्यास पकडले  : आरोपीचा साथीदार मात्र अंधारात पसार

Vigilance of Ramayanar townspeople in Bhusawal : Attal burglars in Madhya Pradesh caught in House Burglary भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील रामायण नगरात बंद घरात चोरटे शिरल्याची माहिती स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी हिंमत करून खंडव्याच्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा चोरटा मात्र अंधारात पसार होण्यात यशस्वी झाला. उमेश संपत भिल (डोंगरी, जहूर, ता.पंढाना, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून अजय (पूर्ण नाव माहित नाही) असे पसार चोरट्याचे नाव आहे. आरोपींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अटकेतील चोरट्याविरोधात खंडवा पोलिसात चोरी-घरफोडीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रामायण नगर वासीयांची सतर्कता
शहरात अलिकडे चोर्‍या-घरफोड्या वाढल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली असताना वरणगाव रोडवरील रामायण नगरातील प्रकाश राजाराम मराठे यांच्या बंद घरात दोन चोरटे शिरल्याची चाहूल शेजारच्या रहिवाशांना लागली. चोरटे घरात शिरताच रहिवासी हरीष शर्मा, भवनसिंग राजपूत, अजय लोकमनसिंग, कृष्णा कुमार झा व रहिवाशांनी हिंमत करून मराठे यांच्या घरातून उमेश भिल यास हिंमत करून पकडले तर दुसरा अजय नामक संशयीत अंधाराचा फायदा घेवून पसार झाला.

मध्यरात्री आरोपीला पोलिसांनी पकडले
चोरट्याला पकडल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता रामायण नगरात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता
प्रकाश मराठे व त्यांच्या पत्नी नलिनी मराठे हे दाम्पत्य आजारी असल्याने पुतण्या वैभव मराठे यांच्याकडे वास्तव्यास आहे त्यामुळे त्यांच्या रामायण नगरातील घराला कुलूप आहे. ही संधी चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता साधली मात्र सतर्क नागरीकांमुळे चोरट्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. मराठे यांचे चुलत भाऊ मनीष उत्तम धुमाळ यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, अटकेतील उमेश संपत भिल (डोंगरी, जहूर, ता.पंढाना, मध्यप्रदेश) यास भुसावळ सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास नाईक तेजस निंबाजी पारीसकर करीत आहेत.