रावेर- तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवरील चोरवड येथे सोमवारी रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशाने शेत-शिवारात दडून बसलेल्या एका संशयित आरोपीस रावेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले तर त्याच्या पसार झालेल्या दुसर्या साथीदारास भोकरी ते रावेर दरम्यान गजाआड करण्यात आले.
गुप्त माहितीवरुन कारवाई
सोमवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास काही चोरटे चोरवड गावात चोरीच्या उद्देश्याने फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार दीपक ढोमणे, हवालदार श्रीराम वानखेडे, कॉन्स्टेबल जाकिर पिंजारी, हरीलाल पाटील, भरत गोराडकर, निलेश चौधरी मंदार पाटील, अजय खंडेराव, योगेश चौधरी, तुषार मोरे आदींनी चोरवड गावात धाव घेतली. पोलिसांची चाहुल लागताच संशयितांनी गावालगतच्या शेती शिवारातून धुम ठोकली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी शेत-शिवारात शोध मोहिम राबवली. तेव्हा एक संशयीत शेतात अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसल्याचे आढळले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे निळ्या रंगाचे कटर आढळले तर चौकशीत त्याने त्याचे नाव करणसिंग मणिलालसिंग बैरागी (23 , रा.नयापुरा, जि.कोटा, राजस्थान) असल्याचे सांगितले तर पसार झालेल्या धर्मवीर सुंदर बावरी (बैरागी, 23, दशहरा मैदान, किशोरपूरा, राजस्थान) यास अटक करण्यात आली. आरोपींनी अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचा संशय आहे.