टाकळी येथील घरातून चोरले होते 38 हजार
चाळीसगाव – शहरातील आर. के. लॉन्स जवळील प्रेरणा सोसायटीत चोरी करुन पळण्याच्या तयारीत असलेल्या धुळे येथील एकास चाळीसगाव शहर पोलीसांनी काल 11 रोजी अटक केली होती. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने टाकळी प्र चा येथील बंद घरातून 38 हजार रुपये चोरी केल्याची कबूली दिली असुन त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन तासातच केली होती अटक
काल आर के लॉन्स जवळील प्रेरणा सोसायटी मधील देविदास तुळशीदास महाजन यांच्या बंद घरातुन धुळे येथील अकबर अली कैसर अली (26) याने 12 हजार 200 रुपयाची रोकड चोरली होती. शहर पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापूराव भोसले व पथकाने अवघ्या 3 तासातच आरोपीस जेरबंद केले होते. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने तालुक्यातील टाकळी प्र चा येथील शिवशक्ती नगर मधील सचिन मगन भदाणे (24) हे परीवारासह घर बंद करुन बाहेरगावी गेले असताना 20 ते 21 मे रोजी वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून आतील शोकेसच्या ड्रावरमध्ये ठेवलेले 38 हजार रुपये रोख व अन्य मुद्देमाल चोरुन नेल्याची कबुली दिली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला 95/2018 प्रमाणे गुन्हा दाखल होता. दोनच दिवसात दोन घरफोड्या उघड झाल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी वर्तविली आहे. पुढील तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.