घरफोडीतील दोन गुन्हेगार एलसीबीच्या ताब्यात

0

जळगाव – पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु|| येथील दुकानात 1 लाख 32 हजार रूपयांचा शेतासाठी लागणारे बियाणांची चोरी केल्याची घटना 20 जून 2018 रोजी घडली होती. या घटनेबाबत पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून दोघांकडून 90 हजार रूपये किंमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावखेडा येथील कृषी बियाणांचे दुकानातून केलेल्या चोरीतील आरोपी जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे संशयास्पद फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल कुऱ्हाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोहेकॉ राजेंद्र पाटील, पोना बापू पाटील, पोकॉ दत्तात्रय बडगुजर, विजय पाटील, योगेश पाटील, विनोद पाटील, नरेंद्र पाटील, अरूण राजपूत, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रविण विराळे आणि दिपक पाटील यांची एक पथक तयार केले. पथकाने जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे सापळा रचून आरोपी शेषराव सुभाष सोनवणे रा. बिलवाडी, शेंदुर्णी ता. जामनेर आणि रवि भिमा मोरे रा. बोंडे शाळेजवळ बोदवड ह.मु. बिलवाडी यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी म्हसावद, माहेजी, सावखेडा येथे कपाशीचे बियाणे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातील 90 हजार रूपये किंमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.पुढील करावाईसाठी आरोपींना पिंपळगाव हरे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.