घरफोडी करणार्‍या महिलेला अटक

0

कात्रज । शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणार्‍या पोलिस रेकॉर्डवरील महिला आरोपीला भारती विद्यापीठ पोलीसांनी गस्त घालत असताना अटक केली. भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी लक्ष्मी संतोष अवघडे (30, रा. पाटण, सातारा) हिने दोन दिवसांपूर्वी राजस सोसायटी भागातील एका बंगल्यामध्ये घरफोडी केली असून त्यातील काही सोने विकण्यासाठी आंबेगांवातील त्रिमूर्ती चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक कमलाकर ताकवले व पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाखेचे राजकुमार वाघचवरे यांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले.

घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. नेकलेस, कानातील टॉप्स यांसह एकूण 102 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 11 हजार 700चा माल जप्त करण्यात आला. ही महिला रेकॉर्डवरील असून तिच्यावर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पो.उप-निरिक्षक श्री. शिवदास गायकवाड करीत आहेत. उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलिस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, भीमराव पुरी, समीर बागसिराज, बाबा नरळे, योगेश सुळे, सुमित मोघे, विक्रम खिलारे, अजित कोकरे, राणी शिंदे, सोनाली झगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.