जळगाव ।शहरातील ओंकारनगरात 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा तोडून 27 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घडली होती. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला शुक्रवारी अटक केली. तो संशयीत मू. जे. महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
27 हजारांचा ऐवज लंपास
ओंकारनगरात बीएसएनलचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत दत्तात्रेय पाटील (वय 61) हे राहतात. 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह पुणे येथे मुलाकडे गेले होते. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र प्रकाश बरडे यांना पाटील यांच्या घराच्या वरच्या मजल्याचे दरवाजे उघडे दिसले. त्यांनी पाटील यांना फोनकरून दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली.
पाटील परत आल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा तोडून लॉकरमध्ये ठेवलेले 12 हजार रुपये रोख, 80 ग्रॅम चांदीचे नाणे, 50 ग्रॅम चांदीचे पदक, टॅब असा एकूण 27 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एलसीबी पथक चोरट्याचा शोध घेत असतांना शुक्रवारी त्यांनी एका संशयिताला अटक केली असून तो मुजे महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थ्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती आहे. यातच त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती देखील मिळाली आहे.