घरफोडी प्रकरण : तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध

भुसावळ : शहरातील दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तब्बल चार घरे फोडल्याची घटना रविवारी दुपारी दोन ते पाच वाजेदरम्यान घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही घटनांमध्ये एकूण पाच लाख 86 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी घरफोडीच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला सुरूवात केली आहे तसेच ज्या भागात चोरी झाली आहे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या
जामनेर रोडवरील ताप्ती पब्लिक स्कूलमागील पियुष कॉलनीत मनोज भास्कर कोल्हे यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख 77 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे तसेच किन्ही रस्त्यावरील साईजीवन फेज- 2 मधील एक विंगमधी फर्निचर व्यावसायीक चंद्रशेखर सीताराम विश्वकर्मा यांच्या घरातून एक लाख 87 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे तसेच गणपत पांडुरंग ठाकूर यांच्या घरातून 20 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे तसेच बि विंगमधील इलेक्ट्रीशीयन भरत विठ्ठल कोळी यांच्या घरातून एक हजारांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी मनोज भास्कर कोल्हे (भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण चार ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये रोकड व सोन्या-चांदीचे दागिणे मिळून पाच लाख 86 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद आहे.

तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास
दरम्यान, चार घरफोड्यांच्या अनुषंगाने जळगावातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंत माग दाखवला तर तज्ज्ञांनी ठसे टिपल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले जात असून तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला जात असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले.