पिंपरी-चिंचवड । घरफोडी, जबरी चोरी व वाहनचोरी करणार्या दोन आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. स्वानंद उर्फ चिक्या नागेश खऱात (वय 19, रा. आंबेडकरनगर, यमुनानगर, निगडी) व प्रवीण उर्फ बाळा अंकुश म्हस्के (वय 35, रा. पत्राशेड, अजंठानगर,चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, पोलीस हवालदार मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, फारुख मुल्ला, स्वामीनाथ जाधव, जमीर तांबोळी, किरण खेडकर, खरीफ मुलानी, रमेश मावसकर, सुनील गायकवाड, किशोर पढेर यांनी केली.
दागिने, रिक्षा, मोटासायकली जप्प
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात होणार्या घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाला आरोपी स्वानंद व प्रवीण यांचा या गुन्ह्यामध्ये हात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एका साथीदाराच्या मदतीने गुन्हे केल्याचे कबूल केले. यामध्ये घरफोडीचे 3 जबरी चोरीचे 2 तर वाहनचोरीचा एक असे सहा गुन्हे उघड झाले आहेत. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी साडेपाच तोळे सोन्याचे दागिने, एक रिक्षा, तीन मोटारसायकली व रोख रक्कम मिळून चार लाख 21 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात आरोपींकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.