निगडी : निगडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये घरफोडी व वाहन चोरीचे 16 गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी सहा लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष मदनराव देशमुख (वय 23, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. मुलावागाव, उमरखेड, जि. यवतमाळ), गौरव अनिल सरोदे (वय 20, रा. दळवीनगर, निगडी), मनोज जनार्दन सरोदे (वय 19, रा. दळवीनगर, निगडी) व सलीम मुक्तार अहमद शेख (वय 23, रा. राजनगर, ओटास्कीम) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
ठिकठिकाणचे गुन्हे उघडकीस
संतोष देशमुख याच्याकडून दुचाकी चोरीचे दहा गुन्हे उघड झाले आहेत. तसेच गौरव सरोदे व मनोज सरोदे या दोघांकडून घरफोडी व वाहनचोरी असे पाच गुन्हे तर सलीम शेख याच्याकडून चोरीचा एक गुन्हा उघड झाला आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणारे घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी निगडी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन राबविला. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये संतोष देशमुख याच्याकडून पिंपरी, निगडी, चाकण, भोसरी, हडपसर, देहूरोड येथील दहा गुन्हे उघड झाले. त्याच्याकडून चार लाख 50 हजार रुपयांच्या 12 दुचाकी जप्त झाल्या. तर गौरव सरोदे व मनोज सरोदे यांच्याकडून निगडी, पिंपरी, खडकी येथील पाच घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शेख याच्याकडून निगडी येथील एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, प्रशांत अहिरे, तात्या तापकीर, फारूक मुल्ला, नितीन बहिरट, नारायण जाधव, आनंद चव्हाण, किरण खेडकर, रमेश मावस्कर, शरीफ मुलाणी, जमीर तांबोळी, मच्छिंद्र घनवट, अशोक जगताप यांनी केली.