घरफोड्या करणारे तिघे जेरबंद

0

पुणे । पुणे शहरात विविध ठिकाणी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणार्‍या दोघांसह एका महिलेला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने जेरबंद केले. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने या घटनांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, घरफोडीच्या गुन्ह्यातील एक सराईत आकाश परदेशी (वय 25 रा. येरवडो) हा येरवडा येथील साईबाबा मंदिराजवळ उभा असल्याची माहिती पोलिस कर्मचारी गजानन सोनुने आणि अशोक माने यांना त्यांच्या खबर्‍यामार्फत मिळाली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून आकाश परदेशी याच्यासह अनिल लष्करे (वय 28, रा. वडारवाडी) आणि उषा कांबळे (वय 25 रा. येरवडा) यांना अटक केली.

5 लाखांचा ऐवज जप्त
अनिल आणि उषा या दोघांनी अलंकार, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रामबाग, विश्रांतवाडी, निगडी, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 10 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 160 ग्राम सोन्याचे दागिने, 590 ग्राम चांदीच्या वस्तू, एक एलईडी टीवी, रुपये 2100 रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 5 लाख 83 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परदेशीच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 24 गुन्हे दाखल असून लष्करे आणि उषा यांच्यावर अनुक्रमे 8 आणि 16 गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.