घरफोड्या करणार्‍या टोळीला मुंब्रा येथून अटक

0

मुंबई : घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणार्‍या पाच जणांच्या टोळीला मुंब्रा येथून टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची रोकड आणि दागदागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 एप्रिल रोजी बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागदागिन्यांची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या दरम्यान, अशा प्रकारे घरफोड्यांच्या अनेक घटना टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. यातील आरोपींना अटक करण्यासाठी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम, परिमंडळ-6चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. पोरे, कांबळे आणि निरी यांच्यासह अंमलदारांची तीन पथके तयार करण्यात आली.

या पथकांनी घरफोड्या करणार्याक टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज खंगाळले. त्यातून या टोळीची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या टोळीतील सदस्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थानात गेली. मात्र, या ठिकाणांहून पोलीस हात हलवत परतले. त्यांच्या हाती एकही आरोपी लागला नाही. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंब्रा येथे लपलेले इमरान कुरैशी, अफजल कुरैशी, शाहिद शेख, इरफान अलवी आणि समीर अलवी यांना अटक करण्यात आली. अटक सर्वच्या सर्व आरोपी उत्तर प्रदेश मेरठ येथील राहणारे आहेत.