घरमालकांची बेफिकीरी; भाडेकरुंची नोंदच नाही!

0

पिंपरी-चिंचवड : विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची सर्वत्र ओळख आहे. पुण्याचाच एक अविभाज्य घटक असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातही आता अनेक नामांकित शैक्षणिक संस्था उदयास आल्या आहेत. शिवाय पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे उद्योगनगरी म्हणून शहर नावारुपास आले आहे. नोकरी-व्यवसाय तसेच शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातून लोक येत असतात. यापैकी अनेक जण भाड्याने खोली किंवा घर घेऊन शहरात राहत असतात. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने भाडेकरुंची परिपूर्ण माहिती घरमालकांनी घेऊन ती पोलीस प्रशासनालादेखील देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक घरमालक भाडेकरुंची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घरमालकांची बेफिकीरी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे भाडेकरुंची नोंद न ठेवणार्‍या घरमालकांवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

हजारो भाडेकरू वास्तव्यास
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, वाकड, हिंजवडी, भोसरी, मोशी याठिकाणी हजारो नागरिक भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. उद्योग-व्यवसाय, नोकरी तसेच शैक्षणिक कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांना निवार्‍याची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक लोकांना चार पैसे मिळू लागल्याने अनेकांनी हा पर्याय निवडला. आपल्या राहत्या घरावर मजले चढवून किंवा इतरत्र दुसरे घर बांधून त्यात अनेकांनी भाडेकरू ठेवले आहेत. मात्र, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घरमालकांनी आपल्या भाडेकरुंची सर्व माहिती घेणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने घरमालक बिनधास्त आहेत.

पोलिसांसाठी डोकेदुखी
शहरातील अनेक घरमालकांनी आपले फ्लॅट, खोल्या शहरात शिक्षण किंवा नोकरी करत असलेल्या तरूण-तरुणींना भाड्याने दिले आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अशा प्रकारे वास्तव्यास असणार्‍यांनी आत्महत्या करण्याचे, गुन्हेगारी कृत्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकरणांचा तपास करताना घरमालकांनाच आपल्या भाडेकरुंची पूर्ण माहिती नसल्याचे वास्तव समोर येत आहे. यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसामध्ये पिंपरीतील शिवसाई कॉर्नर, नैनदीप बिल्डींग, देवगीता सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय शहरातील अनेक भाडेकरुंनी गुन्हेगारी कृत्य केल्याचेदेखील पोलीस तपासात पुढे आले आहे. भाडेकरुंची माहिती घरमालकांनाच नसल्याने पोलिसांना तपास करताना अडचणी येतात. त्यामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढत आहे.

वसतिगृहांमध्ये चालतात गैरप्रकार
पिंपरीतील नेहरुनगराबरोबरच संत तुकारामनगर, वल्लभनगर तसेच आकुर्डी परिसरातील वाल्हेकरवाडी, बिजलीनगर परिसरात हजारो तरूण-तरुणी भाड्याने घेतलेल्या खोल्या, फ्लॅटमध्ये राहतात. या परिसरात अनेक घरमालकांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली आहेत. यामध्ये कॉटबेसिसनुसार दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. मात्र, वसतिगृहाचे मालक दुसरीकडे राहत असल्याने याठिकाणी काय प्रकार चालतात, याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. अनेकदा तरुणांमध्ये भांडणे होतात. चोर्‍यादेखील होतात. काही तरूण-तरुणी अभ्यासाच्या दडपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे आत्महत्यादेखील करतात. अशा प्रकरणात पोलिसांना तपास करताना अडचणी येतात. त्यामुळे भाडेकरुंची परिपूर्ण माहिती व नोंद न घेणार्‍या घरमालकांवर कारवाई केली पाहिजे.

घरमालकांची चौकशी होते
भाडेकरुंची माहिती नोंदवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरमालकांनी आपल्या भाडेकरुची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पाहिजे. भाडेकरुंकडून काही गैरप्रकार घडत असल्यास तसे पोलिसांना कळविले पाहिजे. जे घरमालक आपल्या भाडेकरुंची माहिती देत नाहीत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. आम्ही अनेक घरमालकांची चौकशी करत असतो. काही घरमालक भाडेकरुंची माहिती आम्हाला देतात. तर अनेक जण देत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होते, अशी माहिती संत तुकारामनगर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन घुगे यांनी दिली.