VIDEO: घरांना पडलेल्या चौफेर पाण्याच्या वेढ्यापासून नागरिकांची सुटका

0

जनशक्तिने फेसबुक लाईव्हच्या वृत्ताची दखल ः ग्रामपंचायतीनेे चारी करुन पाणी काढले

जळगाव- शहरातील वाघनगर कोल्हे हिल्ल परिसरातील न्यु लक्ष्मीनगरात एखाद्या पुराप्रमाणेच आठ ते दहा घरांचा चौफेर पाण्याचा वेढा पडला होता. याबाबत दै.जनशक्तिने फेसबुक लाईव्हद्वारे प्रश्‍नाला वाचा फोडली होती. तसेच पाण्यातील घरामधील रहिवाशांची आपबिती मांडली होती. या जनशक्तिच्या फेसबुक लाईव्हच्या वृत्ताची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणी सुटीचा आनंदा साजरा होत असतांना येथील सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे 15 आॅगस्ट रोजी सकाळीच जेसीबीव्दारे चारी करुन साठलेल्या पाण्यासाठी मार्ग काढण्यात आला. शुक्रवारी सायंकाळ पर्यंत 90 टक्के पाणी वाहून गेले असून साठलेले पाणी पंपाव्दारे काढण्यात येणार आहे. प्रश्‍नाला वाचा फोडल्याने पाण्याच्या वेढ्यापासून सुटका झालेल्या घरमालकांनी दै जनशक्तिचे आभार मानले आहेत.

न्यु लक्ष्मी नगर परिसरात भारती गुरव, योगेश बारी यांच्यासह आठ घरांना चौफेर पावसाच्या पाण्याचा वेढा पडला होता. सततच्या पावसामुळे वनविभागाच्या हद्दीतील टेकडीचे पाणी झिरपत असल्याने मोठे प्रमाणावर पाणी साचले होते. दोन ते तीन दिवस रहिवाशांना येण्याजाण्यासह चार ते पाच फुटांपर्यंत पाण्यात ये-जा करुन कसरत क रावी लागत होती. त्याबाबतची माहिती मिळताच दै.जनशक्तिने आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून रहिवाशांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. यादरम्यान रहिवाशांनी येत असलेल्या अडचणी तसेच पाणी काढण्याची मागणी केली होती.

जेसीबीव्दारे करण्यात आली चारी
जनशक्तिच्या फेसबुकलाईव्हच्या वृत्ताची जिल्हा प्रशासनातर्फे दखल घेण्यात आली. तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सदरचे अडचण सोडविण्यात बाबत सुचना करण्यात आल्या. 15 रोजी सकाळी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच सरपंचांनी घटनास्थळ गाठले. व जेसीबीच्या सहाय्याने लांबपर्यंत चारी करुन साठलेल्या पाण्यासाठी वाट करुन दिली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत बरचसे पाण्यापासून रहिवाशांना दिलासा मिळाला होता. रस्ताही मोकळा झाल्याने रहिवाशांना येण्यासाठी वाट मोकळी झाली. वृत्तामुळे न्याय मिळाल्याचे सांगत येथील रहिवाशी भारती गुरव, योगेश बारी, जितू करोसीया यांनी दै.जनशक्तिचे आभार मानले आहे.

वनविभागाने संरक्षण भिंत बांधावी
येथील रहिवाशांकडून माहिती घेतली असता अद्यापही काही पाणी साचलेले आहे. ते पाणी ग्रा.पं.तर्फे पंपाव्दारे काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच केलेल्या चारीमुळे इतर रहिवाशांना त्रास होवू नये म्हणून ज्या ठिकाणी रस्ता येत आहे, त्याठिकाणी पाईप टाकण्यात येणार आहे. वनविभागाच्या हद्दीतून पाणी येत असल्याने विभागाकडून संरक्षण भिंत बांधण्यात यावी, जेेणेकरुन कायमस्वरुपी समस्या सुटेल, अशी मागणी रहिवाशांनी जनशक्तिशी बोलतांना व्यक्त केली आहे.