महाड : महाड तालुक्यातील गांधारपाले आदिवासीवाडी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळून घरात झोपलेले तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांधारपाले आदिवासी वाडीवर हरिश्चंद्र वाघमारे यांच्या जीर्ण झालेल्या घराच्या आतील भिंत शनिवारी यावेळी हरिश्चंद्र उमाजी वाघमारे आणि त्याचे कुटुंब झोपले होते. भिंत अचानक कोसळल्याने हरिश्चंद्र वाघमारे (40), पत्नी पिंकी वाघमारे (35) व रोहन वाघमारे (7) हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
घरकूल योजनेतील हे घर दहा वार्षांपूर्वी बांधण्यात आले होते. या घराची डागडुजी नसल्याने पूर्णतः जीर्ण झाले होते. या घटनेनंतर महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, सरपंच नामदेव पवार, पोलीस पाटील निलेश चिविलकर, सामाजिक कार्यकर्ते मन्सूर ताज व महेश नवले यांनी पाहणी केली. या गावचे तलाठी जी. के. तोडकरी यांनी घराचा पंचनामा केला असुन 27 हजार 500 रुपयांचे नुकसान नोंद करण्यात आली आहे. या वाडीवरील 22 घरे देखील अशाच अवस्थेत आहेत. शेजारील घरांनाही देखील मोठा तडा गेला आहे. विशेष म्हणजे अनेक घरात वीज पुरवठा नाही. वीज बिल न भरली गेल्याने वीज तोडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी या आदिवासींना स्थलांतर करण्याची तयारी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.