नवी दिल्ली : आपल्यासाठी देश सर्वप्रथम असून, पक्ष नंतर आहे. राजकारणापेक्षा देशहित सर्वोच्च असून, देशातील जनता हीच सार्वभौम आहे. तेव्हा जनतेत जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला केले. राजधानी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअम येथे आयोजित बैठकीत पंतप्रधान बोलत होते. या बैठकीची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली व पियूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आगामी निवडणुकांची रणनीतीही या बैठकीत सुनिश्चित करण्यात आली. भ्रष्टाचार करताना जो कुणी पकडला जाईल, त्याला सोडले जाणार नाही. माझा कुणीही नातेवाईक नाही, या शब्दांत त्यांनी पक्षनेत्यांसह सर्वांना रोखठोक इशाराही यावेळी दिला. दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत गंभीर आहे, जे दहशतवादी भारतात आलेत ते मारले गेले आहेत. आपल्याला शेतकर्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करायचे आहे, असेही मोदी यांनी सांगून, आपण राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करून सत्ता चालवित नाही. पक्षहितापेक्षाही देशाचे हित हेच सर्वोच्च आहे, असेही मोदींनी याप्रसंगी नेते व कार्यकर्ते यांना सांगत, लोकांपर्यंत पोहोचा, असा संदेश दिला. पंतप्रधानांच्या भाषणाने दोनदिवशीय या बैठकीचा समारोप झाल्याची माहितीही जेटली यांनी दिली.
घराणेशाही ही काँग्रेसची संस्कृती; शहांनी डागले राहुल गांधीवर टीकास्त्र
अरुण जेटली म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांसह परराष्ट्र व्यवहार धोरणाबाबतही मोदी यांनी पक्षनेते व कार्यकर्ते यांना अवगत केले. डोकलामप्रश्नी पहिल्यांदाच भूमिका मांडताना मोदी म्हणाले, हा वाद आपण फार शांततेने सोडविला असून, लोकांना आश्चर्य वाटले की आम्ही हा प्रश्न कसा सोडविला असेल? एखाद्या गंभीरप्रश्नी भारताने पहिल्यांदाच चीनसोबत अशाप्रकारच्या यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. आम्ही भ्रष्टाचार, गैरप्रकार अजिबात सहन करणार नसून, कुणी भ्रष्टाचार करताना सापडला तर त्याला सोडले जाणार नाही. माझे कुणीही नातेवाईक नाही. आमच्यासाठी पक्षापेक्षा देशच मोठा आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केल्याची माहिती जेटली यांनी दिली. दरम्यान, घराणेशाही हा भारतीय राजकारणाचा पाया असल्याचे वक्तव्य अमेरिकेतील एका विद्यापीठात करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात जोरदार टीकास्त्र डागले. घराणेशाही ही काँग्रेसचीच संस्कृती आहे, भारताची किंवा आमची नाही. भाजप हे नेतृत्वक्षमतेवर विश्वास ठेवते तर काँग्रेसने देशात राजकीय घराणेशाहीला जन्माला घातले, असेही शहा यांनी ठणकावले. दरम्यान, 2014पेक्षाही 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा शानदार विजय होईल, असे प्रतिपादनही शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना केले. या बैठकीची माहिती पक्षाचे प्रवक्ते व केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आगामी निवडणुकांची रणनीतीही या बैठकीत सुनिश्चित करण्यात आली.
भाजपच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दहशतवाद, देशातील अस्वच्छता आणि फोफावलेला भ्रष्टाचार याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. आगामी केरळ निवडणूक पाहाता जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपसोबत जोडण्यासाठी पदयात्रा काढण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली. त्यासाठी 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान केरळात पदयात्रेचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला. खा. राहुल गांधी यांच्यावर अमित शहा यांनी जोरदार टीका केली. राहुल हे देशाच्या प्रतिमेला कलंक लावत आहेत. त्यांनी घराणेशाहीला देशाची संस्कृती सांगून, आंतरराष्ट्रीय समुदयापुढे चुकीचा संदेश दिला. घराणेशाही ही केवळ काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपची नाही. त्यामुळे त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलताना तारतम्य ठेवायला हवे होते, अशी टीकाही शहा यांनी केली. केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वातच देशाची अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचेही शहा यांनी सांगितले. युपीए सरकारपेक्षा एनडीए सरकारच्या काळातच अर्थव्यवस्था सुधारली असून, विरोधकांची टीका निरर्थक असल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल व केरळातील राजकीय हत्यांचा निषेध करत, नक्षलवाद, दहशतवादाची समस्या केंद्र सरकार योग्यप्रकारे हाताळत असल्याचे शहा म्हणालेत, अशी माहितीही पियूष गोयल यांनी दिली. या कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन अमित शहा यांच्याहस्ते झाले होते तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाला.
पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे काम समाधानकारक
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी अजून दीड वर्षे बाकी आहेत. तरीही या निवडणुकीची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे खासदार, भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्यासह सुमारे दोन हजार नेते सहभागी झाले होते. भाजपच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांवर पुढील निवडणुकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दीनदयाल विस्तारक योजनेअंतर्गत देशभर हे पूर्णवेळ कार्यकर्ते पक्षाचे काम करणार आहे. रा. स्व. संघाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच भाजपने पूर्णवेळ कार्यकर्ता ही प्रणाली निश्चित केली आहे. एका वर्षाच्या कार्यकाळात पूर्णवेळ कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या योगदानाबद्दल अमित शहा यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सौभाग्य योजनेद्वारे गरिबांना मिळणार मोफत वीज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल ऊर्जा भवनाचेही लोकार्पण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, ‘प्रधानमंत्री सहज बिजली योजने’चे (सौभाग्य) त्यांनी उद्घाटन केले. देशातील सुमारे 4 कोटी जनतेला या योजनेंतर्ग मोफत वीज उपलब्ध होणार आहे. मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही 4 कोटी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध नाही. थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लाऊन सव्वाशे वर्षे लोटली तरी भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा उजेड नव्हे तर मेणबत्ती, कंदीलाचा उजेडच दिसतो आहे. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार आहे. यासाठी गरिबांना सरकारी कार्यालयांत जाऊन खेटे घालावे लागणार नाहीत. यासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एकही रुपया द्यावा लागणार नाही. गरीबांच्या या सौभाग्याचा संकल्प आम्ही करणार आहोत.