जळगाव । शहरातील गणेश कॉलनी येथील गितेश मधुकर मेश्राम यांच्या बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. मात्र, घरात काहीही न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क कपाऊंडमध्ये उभी असलेली मेश्राम यांची पाच लाख रूपये किंमतीची कार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गितेश यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलून तोडून घरात प्रवेश
गणेश कॉलनी येथे गितेश मधुकर मेश्राम हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, मेश्राम हे वयक्तीक काम असल्यामुळे 21 फेब्रुवारीला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. बंद घर असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपाऊंडच्या दाराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडत त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर कपाट फोडले. त्यातील सामान अस्ताव्यस्थ फेकेले. चोरट्यांना घरात काहीही न मिळाल्याने त्यांनी कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेली कारची चावी घेवून कपाऊंडमध्ये गितेश यांची उभी असलेली पाच लाख रूपये किंमतीची नेक्सा ही कार चोरून नेली. अखेर रविवारी 25 फेब्रुवारीला गितेश हे कुटूंबियांसह सकाळी 8 वाजता घरी परतले. त्यांना कंपाऊंचे कुलूप तुटलेले व कार गायब झाल्याची दिसून आली. घरात प्रवेश केल्यानंतर आत देखील चोरट्यांनी अस्ताव्यस्थ फेकलेले दिसून आले. त्यांनी रविवारी रात्री जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात येऊन घडलेली घटना पोलिसांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अखेर रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात गितेश मेश्राम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.