धुळे । विरदेल परिसरात एका नराधमाने अल्पवयीन मुलींना आपली शिकार बनवून एकाच वेळेस एका दहा वर्षे आणि आठ वर्षाच्या मुलीला धमकावून त्यांच्याशी खोलीत डांबून वारंवार अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पिडीत मुलींच्या मैत्रीणीने आईला सांगण्याचे धाडस केल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर लोहार याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. निरीक्षक गोराड, पीएसआय पी.जी पोतदार, हे.कॉ.प्रकाश पाटील, बाळकृष्ण पाटील, हे.कॉ.एस.के मोरे यांनी लोहारला अटक केली आहे.
अजून किती…?
याबाबत भयभित मुलींनी झालेल्या अत्याचाराबाबत सोबतच्या धाडसी मुलीला माहिती सांगितल्याने त्या मुलीने आपल्या आईला प्रकाराची वाच्यता करताच त्यांनी पिडीत मुलींच्या पालकांना घडला प्रकार सांगून मुलींना बोलते करून थेट पो.स्टे.त जावून पो.नि.सतीश बोराडे यांना अत्याचाराची माहिती दिली.. याप्रकरणी किशोर मन्साराम लोहार, रा.विरदेल ता.शिंदखेडा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल होऊन या नराधमाने आणखी किती मुलींशी असे अनैसर्गिक कृत्य केले आहे, याचा शोध पोलीस घेत आहे.
दिड महिन्यापासून अधूनमधून अत्याचार
लोहार याने दिड महिन्यापूर्वी गावातील दहा वर्षे मुलीसोबत अश्लिल प्रकार करून कोणासही न सांगण्यासाठी पिडीत मुलीला धमकावले होते. यानंतर 20 ते 25 दिवसांपूर्वी लोहार याने गावातीलच आणखी एका आठ वर्षाच्या मुलीला आपले सावज बनविले. तिलाही त्याने स्वतःच्या घरात डांबून तिच्याशीही अनैसर्गिक कृत्य केले.
भित-भित सांगितला प्रकार
अत्याचार झालेल्या या दोन्ही मुली चांगल्या मैत्रीणी होत्या. यामुळे लोहारच्या या अनैसर्गिक कृत्याने दोन्ही मुलींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. या किळसवाण्या प्रकाराने दोन्ही पिडीत मुली भयभीत होत्या. हे कोणाला सांगावे? या विवंचनेत या पिडीत मुली होत्या. मात्र, या पिडीत मुलींची माऊ (नाव बदलले आहे) नावाची एक धाडसी मैत्रीण आहे. ही नेहमीच पिडीत मुलींसोबत राहायची, खेळायची. परंतू, तिच्यासोबत हा प्रकार झालेला नव्हता. यामुळे एके दिवशी दोघा पिडीत मुलींनी त्यांची मैत्रीण माऊला हा घडलेला प्रकार भीत-भीत सांगितला. परंतू, ही माहिती कोणालाही सांगायची नाही,अशी शप्पथही माऊला टाकली होती.
धाडसी मैत्रिणीमुळे प्रकरण उघडकीस
माऊला हा प्रकार सांगतांना दोन्ही पिडीत मुलींमध्ये नराधम लोहारची दहशत होती. आपल्या मैत्रीणींवर खूप मोठे संकट आले असल्याची जाणीव माऊला झाली. तिने धाडस दाखवत हा प्रकार तिच्या आईला सांगितला. हा किळसवाणा प्रकार ऐकून माऊची आई पूरती हादरली होती. इतक्या लहान वयात या मुली खूप काही सहन करीत असल्याची जाणीव झाल्याने माऊच्या आईने तात्काळ दोन्ही पिडीत मुलीचे घर गाठले आणि सर्व घडलेला प्रकार पिडीत मुलींच्या आई-वडिलांना सांगितला.