घरासह बार व्यवसायात फायदा देण्याचे आमिष दाखवून फसवणुक

0

मुंबई – गिरीणी कामगारांना मालकी हक्काने मिळणारी घर स्वस्तात मिळवून देतो, बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये म्युझिक सिस्टमचा व्यवसाय करुन नफा मिळवून देतो तसेच बार भाडेतत्त्वावर मिळवून देतो असे विविध आमिष दाखवून अनेकांची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन वॉण्टेड आरोपींना अखेर डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सतीश मेघश्याम तारकर आणि संतोष बालकुम म्हसकर अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

शंकर शिवे गौडा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गॅ्रटरोड परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांची ओळख संतोष आणि सतीश या दोन भामट्यांशी झाली होती. या दोघांनी त्यांना गिरणी कामगारांसाठी असलेल्या प्रकल्पातील घर कमी किंमतीत मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. काही दिवसांनी त्यांना या दोघांनी बारमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना एक बार भाडेतत्त्वावर मिळवून देतो असेही सांगितले होते. याच दरम्यान त्यांच्याकडून त्यांनी 40 लाख रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. वारंवार कॉल करुनही त्यांचे मोबाईल बंद असल्याचे शंकर गौडा यांच्या लक्षात येताच त्यांनी डी. बी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सतीश तारकर आणि संतोष म्हसकर या दोघांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या या दोघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. पोलीस तपासात त्यांनी अशाच प्रकारे अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध कोणाची तक्रार असल्यास त्यांनी डी. बी. मार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.