घरे मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पाठपुरावा करणार – अजित पवार 

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाटील इस्टेट झोपडपट्टी जळीतग्रस्तांना मदत

पुणे : पाटील इस्टेट झोपडपट्टी जळीतग्रस्तांनी स्वतःला एकटे न समजता, आत्मविेशास न गमवता पुन्हा एकदा संसार उभे केले पाहिजेत. त्यांच्या या प्रयत्नात राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीने त्यांच्या बरोबर आहे. ‘झोपू’अंतर्गत तुम्हांला घरे मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पाठपुरावा करेल, असे आश्वाशन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संलग्न शिवराय पथारी संघटनेच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटील इस्टेट येथील जळीतघटनेतील बाधीत सुमारे 306 कुटुंबांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम शनिवारी शिवाजीनगर पाटील इस्टेट येथील उड्डापुलाखाली आयोजित केला होते. यावेळी शिवराय पथारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर, विरोधी पक्ष नेते दिलीप बर्‍हाटे, चेतन तुपे, निलेश निकम, आशाताई साने, इक्बाल शेख, गणेश नलावडे, सनी मानकर, बाबूराव चांदेरे, राजेश साने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले असताना पवार यांनी मात्र अजून जागा निश्‍चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत फक्त लोकसभेच्या 40 जागांबाबत निर्णय झाला असल्याचे सांगितले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिळून आघाडीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेताना अजूनही पुण्यासह सुमारे आठ जागांचा तिढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जागावाटपात कुठल्याही परिस्थितीत ताकदवान पक्ष किंवा इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निकषानुसार ज्या पक्षाची ताकद संबंधित भागात जास्त आहे त्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतही भाष्य केले असून समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. आंबेडकर पुढील आठवड्यात भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याविषयी शरद पवार व राहुल गांधी यांच्यात चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.