घर खरेदीसाठी पीएफमधील 90% रक्कम काढता येणार!

0

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सुमारे चार कोटी ग्राहक, घर खरेदीसाठी आपल्या पीएफ खात्यातील जमा रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. ग्राहक ही रक्कम घराचे डाऊन पेमेंट आणि हप्ते फेडण्यासाठी वापरू शकतात. ईपीएफओने योजनेत दुरुस्ती करून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, 1952 मध्ये नवा परिच्छेद 68 बीडी जोडला आहे. जेणेकरून ग्राहक घर खरेदीसाठी ईपीएफ खात्यामधून डाऊन पेमेंट आणि हप्ते फेडू शकतात, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. श्रम मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केल्याने या योजनेत दुरुस्ती करण्यात आली आहे, असेही अधिकार्‍याने सांगितले.

तीन वर्षे खात्यामध्ये योगदान देणार्‍यांनाच लाभ
नव्या तरतुदीनुसार, ईपीएफधारक कमीत कमी 10 सदस्य असलेल्या सहकारी किंवा हाऊसिंग सोसायटीचा सदस्य म्हणून, घर खरेदीसाठी किंवा घर आणि जागा खरेदीसाठी ईपीएफ खात्यातील जमा रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. मात्र, ज्या पीएफ ग्राहकांनी तीन वर्षे खात्यामध्ये योगदान दिले, त्यांनाच खात्यामधून रक्कम काढण्याची सुविधा असेल तसेच ही सुविधा एकदाच मिळणार आहे.